शंकरानं धरणीकंप केला, देऊळ हलायला लागलं..खांदा कुणी दिला? शहाजी बापू पाटलांचा औरंगाबादच्या सभेतला किस्सा ऐकला?

अनिल देसाई, सुभाष देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत... हे सगळे पळून गेले होते. त्यामुळे उद्धव साहेबांनी या लोकांना जवळ करणं थांबवा. महाराष्ट्रात सुखानं राजकारण करू द्या, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी सभेत बोलताना केलं.

शंकरानं धरणीकंप केला, देऊळ हलायला लागलं..खांदा कुणी दिला? शहाजी बापू पाटलांचा औरंगाबादच्या सभेतला किस्सा ऐकला?
शहाजी बापू पाटील, आमदार
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Sep 12, 2022 | 6:01 PM

औरंगाबादः भूमरेंच्या सभेला गर्दी होत नाही, असा आरोप करणाऱ्यांसाठीच जणू पैठणमध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) विराट सभा आयोजित करण्यात आली. एकनाथ शिंदे सेनेतील एकापेक्षा एक दिग्गज आमदार आणि मंत्र्यांनी आज पैठणमध्ये हजेरी लावली. शिंदे सेनेचे फेमस आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचं औरंगाबादमधलं भाषणही चांगलंच गाजलं. शेतात काबाड कष्ट करणारा साधा माणूस कशा प्रकारे मुख्यमंत्री झाला, हा प्रवास शहाजी बापू पाटलांनी औरंगाबादच्या सभेत वर्णन केला. यावेळी ते भावूक झाले होते. तसंच भाषण संपवण्याच्या आधी पाटील यांनी आवर्जून एक किस्सा ऐकवला. आम्ही शिवसेनेशी (Shivsena) केलेली बंडखोरी ही गद्दारी नाही तर तो आमची शिवसेना राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचं त्यांनी ठसवून सांगितलं. औरंगाबादच्या सभेतला हा किस्सा चांगलाच चर्चिला जातोय….

कोणती गोष्ट ऐकवली?

शहाजी बापू पाटलांनी औरंगाबादच्या सभेत एक गोष्ट ऐकवली. या गोष्टीचा संदर्भ त्यांनी शिवसेनेच्या स्थितीशी जोडला.

ते म्हणाले, ‘ भूमरे मामा एक बारकी गोष्ट सांगतो. रानात एक महादेवाचं देऊळ होतं. रानाच्या कडेनं शेतीवाडी होती. देऊळ जरा जुनं झालेलं होतं.

दोन चार पुजारी त्या महादेवाची 11-12 वाजता येऊन पूजा करायचे. पांढरं शुभ्र धोतर, गोरेपान, गंध लावलेले सुंदर पुजारी महादेवाची पूजा करायचे.

शेतकरी त्यावेळी न्याहरी सोडायसाठी यायचे. झाडाखाली बसायचे. उष्ट तिथंच टाकायचे. तंबाखू खायचे, पिचकारी टाकायचे.

वरनं महादेव आणि पार्वतीचं विमान चाललं होतं. पार्वती म्हणाली बघा… पूजारी किती सुंदर पूजा करतात. पण शेतकरी बघा कशी घाण करतात…

हे ऐकून महादेवानं धरणीकंप केला, देऊळ हलायला लागलं.. थरथर… थरथर.. देऊळ हलायला लागलं तसं पूजारी ठणाणणाणणा करत बाहेर गेलं आणि शेतकरी उलटं पळत आलं आणि देवळाला खांदा दिला.
महादेवाचं देऊळ आपण पडू द्यायचं नाही.. आम्ही याठिकाणी शिवसेनेचं देऊळ वाचवलं. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंनी बांधलेलं देऊळ पडायला लागलं म्हणून एकनाथ शिंदेंनी खांदा दिला.

देवळात जे गडी बसले होते, अनिल देसाई, सुभाष देसाई, विनायक राऊत, अरविंद सावंत… हे सगळे पळून गेले होते. त्यामुळे उद्धव साहेबांनी या लोकांना जवळ करणं थांबवा. महाराष्ट्रात सुखानं राजकारण करू द्या, असं वक्तव्य शहाजी बापू पाटील यांनी सभेत बोलताना केलं. त्यांचा हा भाषणातला किस्सा चांगलाच व्हायरल होतोय.

शहाजी बापू पाटील भावनिकही झाले…. पहा व्हिडिओत