नागपूर MIDC मध्ये मोठा अपघात, पाण्याची टाकी फुटल्याने 3 कामगारांचा मृत्यू, 8 जण जखमी
Nagpur News : नागपूरमधील बुटीबोरी एमआयडीसी फेज 2 मधील अवाडा सोलर प्लांटमधील एक मोठी पाण्याची टाकी अचानक फुटली आहे. या घटनेत 3 कामगारांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत.

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये आज सकाळी मोठा अपघात झाला आहे. नवीन बुटीबोरी एमआयडीसी फेज 2 मधील अवाडा सोलर प्लांटमधील एक मोठी पाण्याची टाकी अचानक फुटली आहे. पाण्याच्या दबावामुळे ही टाकी फुटल्याचे समोर आले आहे. टाकी फुटल्यानंतर अनेक कामगार टाकीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. यात बऱ्याच कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र या घटनेत 3 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून आठ पेक्षा जास्त जण झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
3 जणांचा मृत्यू
बुटीबोरी एमआयडीसी फेज 2 मधील अवडा सोलर प्लांटमध्ये ही टाकी फुटल्याची घटना घडली आहे. टाकी फुटल्यानंतर मोठा आवाज झाला आणि या टाकीच्या ढिगाऱ्यात अनेक कामगार अडकले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले. मात्र या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
हा अपघात कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे आजूबाजूच्या औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आता कामगारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. या घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
ही घटना घडली तेव्हा या ठिकाणी मोठ्या संख्येने कामगार काम करत होते. त्यामुळे आणखी काही कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले असल्याचा संशय आहे. सध्या ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे आणि अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सध्या प्रशासनाने संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. तसेच जनतेला अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्या जाणाऱ्या जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार देण्यासाठी वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी सज्ज आहेत अशी माहिती समोर आली आहे.
