मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाआधीच मोफत लसीकरणाचं श्रेय घेणं चुकीचं, बाळासाहेब थोरातांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका

| Updated on: Apr 26, 2021 | 12:07 PM

राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून मोफत लसीकरणाचं श्रेय घेण्यात येत आहे. (balasaheb thorat slams ncp and shivsena over free vaccination)

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाआधीच मोफत लसीकरणाचं श्रेय घेणं चुकीचं, बाळासाहेब थोरातांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका
बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई: राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून मोफत लसीकरणाचं श्रेय घेण्यात येत आहे. त्यावरून काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन्ही पक्षांना फटकारले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय जाहीर करण्याआधीच त्याचं श्रेय घेणं योग्य नाही. अशा प्रकारच्या श्रेय घेण्याच्या प्रकारावर काँग्रेसची नाराजी आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे म्हटलं आहे. (balasaheb thorat slams ncp and shivsena over free vaccination)

बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही जाहीर नाराजी व्यक्त केली. मोफत लसीकरणाबाबतची आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही मोफत लसीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. नागरिकांना मोफत लस द्यावी हा आमचा आग्रह आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे तसा आग्रह धरला असून आमची मागणी मान्य होईल, अशी आशा आहे. मुख्यमंत्री मोफत लस देण्याबाबत विचार करत असतानाच श्रेय घेण्यासाठी कोणी हा निर्णय जाहीर करत असेल तर ते चुकीचं आहे. आम्हाला हा प्रकार आवडलेला नाही. काँग्रेसची त्यावर तीव्र नाराजी आहे, असं थोरात म्हणाले. मोफत लसीकरणाच्या श्रेयाची लढाई सुरू आहे. ती योग्य नाही. हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला पाहिजे. कुणीही श्रेयासाठी घोषणा करणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मोफत लसीकरणावेळी गर्दी होऊ शकते

या आधी 45 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यात येत होतं. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली जात होती. तरीही लसीकरणासाठी मोठी गर्दी होत होती. त्यामुळे गोंधळही झाला होता. आता 18 वर्षावरील व्यक्तिंना लस देण्यता येणार आहे. हा वर्ग खूप मोठा आहे. त्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता आहे. गर्दी वाढल्याने गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे सरकारने नियोजन केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. 18 वर्षांवरील व्यक्तिंना कोरोनाची लस देण्यात येणार असल्याने संभाव्य गर्दी टाळण्यासाठी नियोजन करण्याबाबत मी मुख्य सचिवांशी चर्चा केली आहे. त्यांना धोरण ठरवण्यास सांगितलं आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसात धोरण ठरवलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. सर्वांना मोफत लस मिळावं यासाठी केंद्राने मुबलक प्रमाणात लसी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली.

मलिकांनी केली होती घोषणा

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील जनतेचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट केलं होतं. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच (शनिवारी) जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले होते. दरम्यान मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले होते.

आदित्य ठाकरे यांचं ट्विट

नवाब मलिक यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करून मोफत लसीकरणाची घोषणा केली होती. राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमचं कर्तव्य म्हणून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, असं आदित्य यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं होतं. त्यामुळे विरोधकांनी आदित्य यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. (balasaheb thorat slams ncp and shivsena over free vaccination)

 

संबंधित बातम्या:

अभी ज़रा बाज़ आएँ।, संजय निरुपमांनी राष्ट्रवादीला फटकारले; मोफत लसीकरणाच्या श्रेयावरून जुंपली

टक्केवारीसाठी मोफत लसीकरणाचा निर्णय मागे घेऊ नका; पडळकरांनी आता आदित्य ठाकरेंना डिवचले

18 ते 45 वयोगटातील नागरिकांना राज्य सरकारकडून मोफत लसीकरण, नवाब मलिक यांची माहिती

(balasaheb thorat slams ncp and shivsena over free vaccination)