ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांचे निधन

| Updated on: Sep 08, 2019 | 10:31 AM

देशातील ज्येष्ठ आणि सर्वोत्कृष्ट वकील राम जेठमलानी यांचे वयाच्या 95 वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी यांचे निधन
Follow us on

दिल्ली : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ राम जेठमलानी (Ram jethmalani) यांचे वयाच्या 95 वर्षी निधन (Pass away) झालं आहे. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्याभरापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.

जेठमलानी देशातील सर्वोत्कृष्ट वकिलांमधील एक होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे खटले लढले आहेत. जेठमलानी हे केंद्रीय कायदेमंत्रीही होते. त्याशिवाय त्यांनी बार काऊन्सिल ऑफ इंडियाचेही अध्यक्षपद भूषविले आहे.

राम जेठमलानी यांनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधींच्या हत्या ते चारा घोटाळा पर्यंतचे खटले लढवले होते. याशिवाय लोकसभेवर झालेल्या हल्ल्यातील आरोपी अफजल गुरु आणि सोहराबुद्दीन एनकाऊन्टरमध्ये अमित शाह यांचा खटलाही त्यांनी लढवला होता.

राम जेठमलानी यांचा जन्म 14 सप्टेंबर 1923 रोजी पाकिस्तानमध्ये झाला होता. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. भारत पाकिस्तान फाळणीनंतर, ते वकिली पेशातील करिअरसाठी मुंबईत आले होते.

राम जेठमलानी यांचा अल्पपरिचय

जेठमलानी हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी नेहमी चर्चेत असायचे. 2017 मध्ये त्यांनी वकील म्हणून निवृत्ती स्वीकारली. देशातले सगळ्यात महागडे वकील म्हणूनही त्यांची ओळख होती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात जेठमलानी हे कायदे मंत्री होते. भाजपात असताना त्यांनी पक्षाविरोधात अनेक विधाने केली होती. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती.

जेठमलानी यांनी आतापर्यंत अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान, शेअर बाजार घोटाळ्यातला आरोपी हर्षद मेहता आणि केतन पारेख, जेसिका लाल हत्याकांडातला मनू शर्मा, राजीव गांधी आणि इंदिरा गांधींचे मारेकरी, तसंच बेकायदेशीर खाण प्रकरणातले आरोपी आणि सध्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा, आसाराम बापू, जयललिता, अरविंद केजरीवाल अशी हायप्रोफाईल प्रकरणं आणि व्यक्तींचे खटले जेठमलानी यांनी लढवले आहेत.

राम जेठमलानी यांनी लढवलेले महत्त्वाचे खटले

  • राम जेठमलानी यांनी 1959 मध्ये नानावटी विरुद्ध महाराष्ट्र राज्य हा खटला लढला तेव्हा ते देशाला माहित झाले. यानंतर त्यांचा आलेख वाढतच गेला.
  • 2011 मध्ये त्यांनी मद्रास हायकोर्टात राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची बाजू मांडली.
  • देशभरात गाजलेल्या स्टॉक मार्केट घोटाळ्यात जेठमलानी केतन पारेख आणि हर्षद मेहता यांचे ते वकील होते.
  • दहशतवादी अफजल गुरुच्या फाशीलाही जेठमलानी यांनी विरोध केला होता.
  • दिल्लीतील जेसिका लाल हत्या प्रकरणात त्यांनी मनू शर्मा या आरोपीची बाजू मांडली होती.
  • सोहराबुद्दीन एनकाऊन्टरमध्ये त्यांनी अमित शाह यांचा खटला लढला होता.