Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या हालचाली वाढल्या, कोअर कमिटी बैठक, आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेश

मुंबईत भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय. भाजपची कोअर कमिटीची (BJP Core Committee) बैठक होणार आहे. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची रिघ पाहायला मिळतेय.

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या हालचाली वाढल्या, कोअर कमिटी बैठक, आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेश
उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 27, 2022 | 5:15 PM

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयानं एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळालाय. सर्वोच्च न्यायालयाकडून बंडखोर आमदारांना कारवाईपासून 11 जुलैपर्यंत दिलासा दिला आहे. त्यामुळे तुर्तास तरी शिंदे गटातील आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार नाही. अशावेळी शिंदे गटाकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना दिलं जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्याचवेळी मुंबईत भाजपच्या गोटात हालचालींना वेग आलाय. भाजपची कोअर कमिटीची (BJP Core Committee) बैठक होणार आहे. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची रिघ पाहायला मिळतेय.

सुधीर मुनगंटीवारांचं व्हिक्ट्री साईन

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला दिलासा मिळाला असला तर भाजपच्या गोटातही आनंद पाहायला मिळतोय. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. मात्र गाडीतूनच त्यांनी व्हिक्ट्री साईन दाखवला. तसंच त्यांच्या चेहऱ्यावरील हसू खूप काही सांगून जाणारं होतं.

भाजपचा कुठेही सहभाग नाही – चंद्रकांत पाटील

आम्ही आमच्या कामात आहोत. सत्ताबदलाच्या प्रयत्नात आम्ही नाही. आताही आम्ही आमच्या एका राष्ट्रीय कमिटीच्या बैठकीत जात आहोत. तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी शिंदे गटातील आमदारांना काय उत्तर द्यायचं, काय कारवाई करायची आणि त्याला शिंदे गटातून काय उत्तर दिलं जातं हा त्यांचा मुद्दा आहे. महत्वाची बाब म्हणजे हा पूर्णपणे शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे, त्यात भाजपचा कुठेही सहभाग नाही, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

सत्तास्थापनेबाबत आमच्यात कुठलीही चर्चा नाही – कराड

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनीही राज्यातील राजकीय घडामोडींमागे भाजप नसल्याचं स्पष्ट केलंय. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, आम्ही त्यांच्यासोबत आहोत. रावसाहेब दानवे काय बोलले मला माहिती नाही. पण सत्तास्थापनेबाबत आमच्यात कुठलीही चर्चा नाही, असं कराड म्हणाले.

भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश

दुसरीकडे भाजपच्या राज्यातील सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सत्तास्थापनेची तयारी सुरु झाल्याचं बोललं जात आहे.