तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अतुल भातखळकरांचा घणाघात

| Updated on: Jul 05, 2021 | 3:42 PM

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अशा शब्दात भातखळकर यांनी जोरदार हल्ला चढवलाय.

तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अतुल भातखळकरांचा घणाघात
भास्कर जाधव, अतुल भातखळकर
Follow us on

मुंबई : विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या जोरदार राड्यानंतर भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ केल्याचा आरोप खुद्द जाधव यांनी केलाय. त्यानंतर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला. तो प्रस्ताव आवाजी बहुमतानं मंजूर करण्यात आलाय. त्यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अशा शब्दात भातखळकर यांनी जोरदार हल्ला चढवलाय. (Atul Bhatkhalkar criticizes Shiv Sena MLA Bhaskar Jadhav)

तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल. धक्काबुक्की कुणीही केली नाही. शिवसेना आमदारानेच शिवीगाळ केलीय. आपण गोंधळावेळी डायसवरही गेलो नव्हतो, पण शिवसेनेवर, सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतो म्हणून माझं निलंबन करण्यात आलंय. ओबीसी आरक्षणासाठी 106 आमदारांचं निलंबन केलं तरीही आम्ही हा लढा सुरुच ठेवू. आमचे नेते देवेंद्र फडणवीस आहेत. ते सांगतील त्या प्रमाणे लढाई लढण्यात येईल. आमचं संख्याबळ कमी झालं असलं तरी अकेला देवेंद्र काफी है, अशी घणाघाती टीका अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलीय.

भाजपच्या कोणत्या आमदारांचं निलंबन?

ओबीसी आरक्षणावरील ठरावावर चर्चा सुरू असताना राजदंड उचलणे, माईक ओढणे आणि सभागृह अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज एकूण 12 सदस्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. आशिष शेलार, योगेश सागर, अभिमन्यू पवार, संजय कुटे, अतुल भातखळकर, पराग अळवणी, गिरीश महाजन, राम सातपुते, हरीश पिंपळे, नारायण कुचे, जयकुमार रावत किर्तीकुमार बागडीया आदी आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या वर्षभरात त्यांना मुंबई आणि नागपूर येथील अधिवेशनात सामिल होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी ही माहिती आज विधानसभेत दिली.

मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या – जाधव

विधानसभेचं कामकाज सुरू होताच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरील चर्चे दरम्यान झालेल्या घटनेचा तपशील दिला. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. काही आमदारांनी माईक ओढण्याचा प्रयत्न केला. सभागृहात ताणतणाव होत असतात. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढत असतात. सत्ताधारी विरोधकांवर धावून जातात. पण एकदा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं तर विषय तिथेच संपतो. मी सभागृहात कधीही कटुता ठेवत नाही. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आपण लोकशाहीच्या मंदिरात बसतो. आपण साधनसुचितेच्या गोष्टी करतो. सभ्यतेचा आव आणतो, पण आपण कसं वागतो?, असा सवाल करतानाच विधानसभा अध्यक्षांनी मला खुर्ची बसायला दिली. मी बसलो नाही. कारण मी अध्यक्ष-उपाध्यक्ष नाही म्हणून मी बसलो नाही. त्यानंतर फडणवीस आले. मी त्यांना बसायला खुर्ची दिली. चंद्रकांत पाटलांना खुर्ची दिली, याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.

संबंधित बातम्या :

Breaking : विधानसभेत तुफान राडा; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, कोणकोणत्या आमदारांचा समावेश?

मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा; भास्कर जाधवांनी उपटले विरोधकांचे कान

Atul Bhatkhalkar criticizes Shiv Sena MLA Bhaskar Jadhav