आधी शिवेंद्रराजे भोसले-शशिकांत शिंदेंची जवळीक, आता उदयनराजे शंभूराज देसाईंच्या घरी

| Updated on: Feb 19, 2021 | 11:14 AM

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले.

आधी शिवेंद्रराजे भोसले-शशिकांत शिंदेंची जवळीक, आता उदयनराजे शंभूराज देसाईंच्या घरी
उदयनराजे भोसले, शंभूराज भोसले
Follow us on

सातारा : एकीकडे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असताना, साताऱ्यात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे दिलजमाईचे संकेत आहेत. त्यानंतर आता भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय खलबते रंगली.

दरम्यान, उदनयराजे आणि शंभूराज देसाई यांची ही काही पहिलीच भेट नाही. यापूर्वी अनेकवेळा दोन्ही नेते एकमेकांना भेटले आहेत. उदयनराजे आणि शंभूराज देसाई हे वर्गमित्र आहेत. यापूर्वीच्या भेटीत शंभूराज देसाईंनी ही माहिती दिली होती.

भेटीनंतर उदयनराजे काय म्हणाले? 

शंभुराज देसाई यांचे घराण्याचे घनिष्ठ संबंध आहेत. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत दोन दिवसात महत्वाच्या नेत्यांची संयुक्त बैठक होणार असल्याचे ते म्हणालेत. 8 मार्चपासून मराठा आरक्षण सुनावणी आहे. मराठा आरक्षणाबाबत कोणीही राजकारण करु नये. त्यादरम्यान अधिवेशन होत असल्यामुळे या विषयी चर्चा झाली. सातारा शहरात लष्कर प्रशिक्षण केंद्र आणण्याबाबत शंभुराज देसाईंसोबत चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत लीड कायम मी घेतलंय पण आता ते गळाला आलंय. वकील सर्वच हुशार आहेत, परंतु जी आत्मियता लागते अशा वकिलांची नेमणूक करा. मी कोणाच्या विरोधात नाही पण यामध्ये विसंगती दिसून येते. जिल्हा बँकेची निवडणुक लागलीये याप्रश्नावर फलटणचे राजे,आमचे सातारचे राजे,लोकशाहीचे राजे कसली आखणी करताहेत हे काळ आणि वेळ सांगेल, असं उदयनराजे म्हणाले.

उदयनराजेंच्या भेटीगाठी 

उदयनराजे भोसले हे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात उदयनराजेंनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या होत्या.

शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंचे दिलजमाईचे संकेत

दरम्यान, भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचे दिलजमाईचे संकेत आहेत. जावळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. “शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहित नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी आपल्या तिघांनाही कळत असतं” असं सूचक वक्तव्य सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosle) यांनी केलं. त्यामुळे शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत घरवापसी करणार का, असा सवाल उपस्थित झाला आहे.

शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली. तर राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभा निवडून आलेले खासदार उदयनराजे भोसले यांनीही खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. 14 सप्टेंबर 2019 रोजी उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर भाजपने उदयनराजेंना राज्यसभेवर पाठवलं.  त्यामुळे मूळचे राष्ट्रवादीचे असलेले दोन्ही राजे सध्या भाजपमध्ये आहेत.

संबंधित बातम्या 

शशिकांत शिंदेंसोबत दिलजमाईचे संकेत, शिवेंद्रराजेंचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’? 

शिवेंद्रराजे भोसलेंना राष्ट्रवादीची मोठी ऑफर; शशिकांत शिंदे म्हणतात…