गद्दारासोबत गद्दारीच केली जाते, भाजप खासदाराचं शिवसेना खासदाराला प्रत्युत्तर

एकीकडे राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार येणार असल्याचं सांगत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेनेत वाकयुद्ध (BJP Shivsena MP dispute in Nanded) रंगलं आहे.

गद्दारासोबत गद्दारीच केली जाते, भाजप खासदाराचं शिवसेना खासदाराला प्रत्युत्तर
| Updated on: Oct 27, 2019 | 6:37 PM

नांदेड: एकीकडे राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार येणार असल्याचं सांगत आहेत, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेनेत वाकयुद्ध (BJP Shivsena MP dispute in Nanded) रंगलं आहे. नांदेडमध्ये शिवसेनेच्या पराभवाला भाजपचे खासदार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी केला. त्यावर प्रत्युत्तर देत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी गद्दारासोबत गद्दारीच केली जाते, असं प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजप खासदारांमध्ये वाकयुद्ध (BJP Shivsena MP dispute in Nanded) सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या वाकयुद्धामुळे जिल्ह्यात दोन्ही खासदार चांगलेच चर्चेत आले आहेत.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजर्षी पाटील निवडणूक मैदानात होत्या. याच मतदारसंघात भाजपचे बंडखोर दिलीप कंदकुर्ते यांनी देखील उमेदवारी अर्ज भरला होता. कंदकुर्ते यांना खासदार प्रताप पाटील यांचे पुत्र प्रवीण पाटील यांचं पाठबळ मिळालं. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेनेचा पराभव होऊन अनपेक्षितपणे काँग्रेसचा विजय झाला. त्यामुळे या पराभवाला भाजपचे खासदार चिखलीकर जबाबदार असल्याचा आरोप खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे.

खासदार हेमंत पाटील यांनी अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसशी संधान साधून युतीच्या धर्मात गद्दारी केली. त्यामुळे गद्दारांसोबत गद्दारीच केली जाते, असं प्रत्युत्तर भाजप खासदार चिखलीकर यांनी दिलं आहे.

नांदेडमध्ये याविषयी काही बॅनरही लावण्यात आले आहेत. हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. आगामी काळात नांदेडचे राजकारण या दोन्ही खासदारांच्या भोवती केंद्रित होऊन वादात राहणार असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे नांदेडमध्ये पुढील अडीच वर्षे कुठल्याही निवडणुका नसल्याने या वादाला कितपत फोडणी मिळेल हाही प्रश्नच आहे.