कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून मुख्यमंत्र्यांनी राज्याची प्रतिमा धुळीला मिळवली- भाजप

| Updated on: Mar 14, 2021 | 4:26 PM

एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याची घणागाती टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलीय.

कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून मुख्यमंत्र्यांनी राज्याची प्रतिमा धुळीला मिळवली- भाजप
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : एनआयएने दहशतवादी कटात अटक केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला राज्याचे मुख्यमंत्री पाठीशी घालत होते, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे. एका कलंकित अधिकाऱ्याला पाठीशी घालून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि राज्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवल्याची घणाघाती टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केलीय. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक सचिन वाझे यांचा बचाव का केला? हे समजण्यापलीकडचं असल्याचा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलाय.(Chandrakant Patil criticizes Thackeray government over Sachin Waze case)

‘आपल्या लोकशाही व्यवस्थेत कोणताही राजकीय पक्ष प्रथम आपल्या संविधानाशी निष्ठा बाळगतो आणि नंतर जनतेचा पाठिंबा मिळवतो, परंतु इथं उद्योगपतींच्या घातपाताची आणि समाजातील शांतता भंग करणाऱ्यांचं समर्थन शिवसेना करत होतीट, अशी टिकाही चंद्रकांतदादांनी केलीय. ‘मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्याची उत्तरे महाराष्ट्राची जनताही शोधत आहे. वाझे यांचं समर्थन का केलं जात होतं? असा सवाल करतानाच नक्की कोणते मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना या संपूर्ण घटनेची कल्पना होती आणि तरीही त्यांनी मौन बाळगले?’ असंही पाटील यांनी विचारलं आहे.

‘मुंबई पोलीस, NIA वर विश्वास’

हे फक्त हत्येचं प्रकरण नाही, तर हा देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट होता. ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी संशयास्पदरित्या सहभागी होता. पण जनतेला महाराष्ट्र पोलिस, मुंबई पोलिस आणि एनआयएवर पूर्ण विश्वास आहे आणि ते याप्रकरणाचा तपास करुन खऱ्या सूत्रधाराला अटक करुन या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश करतील, अशी विश्वासही पाटील यांनी व्यक्त केलाय.

‘सचिन वाझेंना कुणाचा पाठिंबा ते समोर आलं पाहिजे’

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे सरकावर निशाणा साधलाय. ‘हे संपूर्ण प्रकरणत अत्यंत गंभीर आहे. पोलिसांतील लोकच असं काम करत असतील, अशा गंभीर गुन्ह्यात त्यांचाच सहभाग असेल तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? असा सवाल फडणवीसांनी राज्य सरकारला विचारलाय.

‘..म्हणून सचिन वाझेंना बळ मिळालं’

सचिन वाझे हे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निलंबीत होते. मी मुख्यमंत्री असताना शिवसेनेकडून त्यांना पुन्हा कर्तव्यावर रुजू करुन घेण्याचा आग्रह होता. त्याबाबत आपण अॅडव्होकेट जनरल यांच्याची चर्चा केली. पण त्यांना पुन्हा कामावर घेणं योग्य नव्हतं. आता कोरोनाचं कारण देत ठाकरे सरकारनं त्यांना फक्त कामावरच घेतलं नाही तर क्राईम ब्रांचमध्ये घेतलं. मुंबईतील प्रत्येक केस त्यांच्याकडे जाईल अशी व्यवस्थाही केली. मग सरकारने दाखवलेला या विश्वासाच्या जोरावर आपण काहीही करु शकत, असं वाझेंना वाटत होतं. सचिन वाझेंवर सरकारचा एवढा विश्वास का होता? त्यातूनच त्यांना गंभीर गुन्हे करण्याचं बळ मिळालं, अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: ‘एनआयए’चा फास आणखी आवळला; सचिन वाझेंना 10 दिवसांची पोलीस कोठडी

वाझेंना पोलीस दलात घेण्याचा शिवसेनेने माझ्याकडे आग्रह धरला होता; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

Chandrakant Patil criticizes Thackeray government over Sachin Waze case