23 मेनंतर या दोन राज्यात काँग्रेसचं सरकार पडणार?

23 मेनंतर या दोन राज्यात काँग्रेसचं सरकार पडणार?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर राज्यस्तरावरच्या राजकारणालाही वेग आलाय. मध्य प्रदेशात भाजपने मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा केलाय. भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पक्ष लिहून विधानसभेच्या विशेष सत्राची मागणी केली आहे. तर कर्नाटकातही हीच परिस्थिती आहे. काँग्रेसचे 20 आमदार कोणत्याही परिस्थितीत मोठा निर्णय घेऊ शकतात, असा दावा काही दिवसांपूर्वीच भाजपकडून करण्यात आला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन राज्यांमध्ये सत्तांतर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

मध्य प्रदेशातील परिस्थिती काय आहे?

मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार अल्पमतात असल्याचं विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी म्हटलंय. कमलनाथ सरकार आपोआप पडणार आहे. माझा घोडेबाजारावर विश्वास नाही. पण सरकार पडण्याची वेळ आली आहे आणि ते लवकरच पडेल. आम्ही विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांना विनंती करणार आहोत, असं गोपाल भार्गव म्हणाले. काँग्रेसचे काही आमदार कमलनाथ यांच्या सरकारवर नाराज असल्याचा भार्गव यांचा दावा आहे.

काँग्रेसचं भाजपला उत्तर

मध्य प्रदेश सरकार बहुमतात असून काँग्रेसने दिवसा स्वप्न पाहणं बंद करावं, असं उत्तर काँग्रेसने दिलंय. संसदीय नियमानुसार आमदारांच्या मागणीनंतर किंवा मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतरच विशेष सत्र बोलावलं जाऊ शकतं, असं काँग्रेस नेते मुकेश नायक यांनी सांगितलं.

मध्य प्रदेश विधानसभेतील समीकरण

2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनी पराभव झाला. 230 सदस्य असलेल्या विधानसभेत काँग्रेसला 114, भाजपला 109, बसपा 02, सपा 01 आणि 04 अपक्षांनी विजय मिळवला होता. बसपा आणि इतर अपक्ष आमदारांनी कमलनाथ यांना पाठिंबा दिला. त्यामुळे बहुमतापासून दूर असलेल्या काँग्रेसने सरकार स्थापन केलं.

कर्नाटकातही सत्तापालट?

मध्य प्रदेशप्रमाणे कर्नाटकातही काँग्रेस आणि जेडीएस यांनी सत्ता स्थापन केली होती. कर्नाटकात भाजप मोठा पक्ष ठरला असताना काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि सत्ता स्थापन केली. पण काँग्रेसचे 20 आमदार नाराज असून ते कोणत्याही क्षणी मोठा निर्णय घेऊ शकतात, असा दावा भाजपचे कर्नाटकातील प्रमुख नेते बीएस येदियुरप्पा यांनी केलाय.

कर्नाटकातील सरकार गेल्या अनेक महिन्यांपासून पडणार अशी चर्चा आहे. कारण, अत्यंत काठावरचं बहुमत या सरकारकडे आहे. काँग्रेस 78, जेडीएस 37 आणि बसपा 01 अशा 116 जागांसह सध्या सरकार आहे. विरोधात असलेल्या भाजपकडे 104 जागा आहेत. तर दोन अपक्षांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे 113 या मॅजिक फिगरच्या भाजप जवळ जाताना दिसत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI