भाजपच सरकार स्थापन करणार, जे शक्य ते सर्व प्रयत्न करणार : नारायण राणे

| Updated on: Nov 12, 2019 | 9:27 PM

भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला (Narayan Rane). तसेच, सत्तास्थापनेसाठी जे काही करावं लागेल ते करेन, असंही राणे म्हणाले.

भाजपच सरकार स्थापन करणार, जे शक्य ते सर्व प्रयत्न करणार : नारायण राणे
Follow us on

मुंबई : भाजप सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला (Narayan Rane). तसेच, सत्तास्थापनेसाठी जे काही करावं लागेल ते करेन, असंही राणे म्हणाले (BJP will Establish Govt).

“राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी सर्वांनाच कल्पना आहे. आज मी मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांनी सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करु असं त्यांनी सांगितलं. आता आम्ही (भाजप) सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार आहोत. लवकरच भाजपचं सरकार स्थापन होईल”, असा दावा नारायण राणे यांनी केला. तसेच, मी भाजपमध्ये आहे, सत्ता येण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेन, असं त्यांनी सांगितलं.

“मी सत्तास्थापन करण्यासाठी भाजप मदत करणार आहे. मात्र, मी जास्त माहिती देणार नाही, नाहीतर येणारेही यायचे थांबतील”, असं सांगत राणेंनी विरोधीपक्षांना सुचक इशारा दिला आहे. तसेच, शिवसेना महाआघाडीसोबत जाईल, असं वाटत नसल्याचंही मत त्यांनी मांडलं. ते अनेक दिवसांपासून चर्चा करत आहेत. लोकशाही आहे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असं राणे म्हणाले.

सत्तास्थापनेसाठी 145 आमदार लागतात. भाजप जेव्हा सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडे जाईल, तेव्हा 145 आमदारांची यादी घेऊन जाईल, असं सांगत राणे यांनी भाजप सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगितलं.

राज्यावर राष्ट्रपती राजवट ओढवण्यासाठी शिवसेना जबाबदार असल्याचा आरोपही राणे यांनी केला. शेतकऱ्यांची काळजी आहे सांगत राज्यातील दुष्काळाची पाहणी केली आणि आज त्याच शेतकऱ्यांसाठी स्थिर सरकार आणण्यात अडथळा निर्माण केला, आज राज्यात जी स्थिती निर्माण झाली आहे, ती शिवसेनेने अडथळा आणल्याने झाली, असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

निवडणुकीपूर्वी युती झाली. 160 हून अधिक जागा निवडून आल्या. अशावेळी वेगळा विचार करणे नैतिकतेला धरुन नाही, असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला. तर, निवडणुकीआधी युती झाली ते वचन नाही का? त्यामुळे त्यांनी वचन पाळलं नाही असं म्हणण्याचा त्यांना (शिवसेना) अधिकार नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भाजप सरकार स्थापन करणार असून कामाला लागा, असं सांगितलं आहे, असंही राणे म्हणाले.