Riteish Deshmukh | मुंबईच्या महापौरपदासाठी काँग्रेसची ‘लय भारी’ प्लॅनिंग, रितेश देशमुखचं नाव कन्फर्म?

| Updated on: Aug 24, 2021 | 12:34 PM

मुंबई काँग्रेस स्ट्रॅटेजी कमिटी सचिव गणेश कुमार यादव यांनी अहवाल सादर करत मुंबईच्या महापौरपदासाठी काही अभिनेत्यांच्या नावांचा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. यात अभिनेता रितेश देशमुख, मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आणि अभिनेता सोनू सूद यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती आहे.

Riteish Deshmukh | मुंबईच्या महापौरपदासाठी काँग्रेसची लय भारी प्लॅनिंग, रितेश देशमुखचं नाव कन्फर्म?
Riteish Deshmukh
Follow us on

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित मुंबई महापालिका निवडणुका (BMC Election 2021) अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. बीएमसी इलेक्शनसाठी ‘एकला चलो रे’चा नारा दिलेल्या काँग्रेसने आता मुंबईच्या महापौरपदासाठीही जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचं दिसत आहे. काँग्रेसच्या स्ट्रॅटेजी कमिटी सचिवांकडून नुकताच याबाबत एक अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानंतर मुंबईच्या महापौरपदासाठी काँग्रेसची मदार प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्यांवर असल्याचं बोललं जात आहे.

कोणकोणत्या अभिनेत्यांच्या नावाचा समावेश?

मुंबई काँग्रेस स्ट्रॅटेजी कमिटी सचिव गणेश कुमार यादव यांनी हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात मुंबईच्या महापौरपदासाठी काही नावांचा विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यात बॉलिवूडमध्ये मराठी पताका फडकवणारा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh), मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) आणि लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी मदतीचा हात देणारा अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप रितेशसह कुठल्याच अभिनेत्याची यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही

रितेश देशमुखला राजकीय वारसा

42 वर्षीय रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा द्वितीय सुपुत्र. मोठे बंधू अमित देशमुख हे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत, तर धाकटे बंधू धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार. त्यामुळे बॉलिवूडमध्ये नाव कमवलेल्या रितेश देशमुखसाठी राजकीय क्षेत्र नवीन नाही. दोन्ही भाऊ काँग्रेसचे नेते असल्यामुळे रितेशसाठी पक्षही ओळखीचा आहे.

बॉलिवूडमध्ये मोठं नाव

घरातच राजकारणाचं बाळकडू मिळालं असतानाही रितेश देशमुखने मनोरंजन विश्वाची वाट निवडली. 2003 मध्ये तुझे मेरी कसम या चित्रपटातून रितेशने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. (तत्कालीन) मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा बॉलिवूड डेब्यू म्हणून रितेश आणि सिनेमाकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष होत. मात्र 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या मस्ती या कॉमेडी चित्रपटामुळे त्याला खरी ओळख मिळाली.

त्यानंतर क्या कूल है हम, ब्लफमास्टर, हे बेबी, धमाल, हाऊसफुल्ल यासारख्या विनोदी धाटणीच्या चित्रपटांतून त्याने प्रामुख्याने भूमिका केल्या. मस्ती, क्या कूल है हम, धमाल, हाऊसफुल्ल या सिनेमांचे अनेक सिक्वेलही गाजले. एक व्हिलन चित्रपटात त्याने पहिल्यांदाच साकारलेली नकारात्मक भूमिका भाव खाऊन गेली होती.

मराठी सिनेविश्वातही पाऊल

बालक पालक (2013) या गाजलेल्या मराठी चित्रपटाची निर्मितीही त्याने केली होती. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्याने लय भारी (2014) सिनेमातून मराठी सिनेविश्वात अभिनय क्षेत्रात दमदार पाऊल ठेवलं. त्यानंतर माऊली सिनेमातही तो झळकला होता.

सामाजिक क्षेत्रातही योगदान

एप्रिल 2016 मध्ये आलेल्या दुष्काळानंतर लातूर जिल्ह्यातील पाण्याची गरज भागवण्याच्या दृष्टीने रितेशने ‘जलयुक्त लातूर’ साठी 25 लाख रुपयांचे योगदान दिले होते. रितेश आणि जेनेलियाने 2019 मध्ये महाराष्ट्रातील पूर निवारणासाठी 25 लाख रुपये दान केले होते.

आता रितेश देशमुखच्या नावावर शिक्कामोर्तब करत काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईच्या महापौरपदासाठी काँग्रेसची मदार अभिनेते, सेलिब्रेटींवर? स्ट्रॅटेजी कमिटीचा अहवाल, तीन नावं चर्चेत

काँग्रेसकडून थेट महापौरपदाची ऑफर, सोनू सूदची पहिली रोखठोक प्रतिक्रिया