‘तपास योग्य दिशेनंच, दोषीला कठोर शिक्षा देणार’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| Updated on: Feb 28, 2021 | 7:32 PM

संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहितीही मुख्यमंत्र्य़ांनी दिली. मात्र, पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार शरसंधान साधलं.

तपास योग्य दिशेनंच, दोषीला कठोर शिक्षा देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र
Follow us on

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहितीही मुख्यमंत्र्य़ांनी दिली. मात्र, पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार शरसंधान साधलं. ‘सरकार चालवताना आमची जबाबदारी असते की न्यायाने वागणे. गेल्या काही महिन्यात गलिच्छ राजकारण सुरु. तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे. पण एखाद्याला आयुष्यातून उठवायचं म्हणून तपास होता कामा नये. गेल्या काही दिवसांपासून आम्ही म्हणू तिच पूर्व दिशा असल्याचं विरोधकांना वाटतं’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. (Uddhav Thackeray claims that investigation in Pooja Chavan case is going in the right direction)

दोषीला कठोर शिक्षा देऊ- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. ‘प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. तुम्ही म्हणत असाल की इतके दिवस का लावले. गुन्हा दाखल करुन मोकळं होणं याला न्याय म्हणत नाहीत. ज्या वेळी घटना कळली. त्यावेळीच तपासाचा निर्णय झाला. पोलिसांना तसा आदेश दिला. तपासातून सत्य बाहेर येईल तेव्हा कुणालाही पाठीशी घालणार नाही. दोषीला कठोर शिक्षा देऊ’, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिलं.

‘तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवणं चुकीचं’

‘तपास व्यवस्थित होऊ द्या. तुमच्या काळातही हीच तपास यंत्रणा होती. ज्या पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवत आहात. तुमच्या काळातही त्यांनीच तपास केला होता. मग आता अविश्वास कसा दाखवता? पोलीस हा सरकारचा कणा असतो, अशावेळी त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे’, असं ही मुख्यमंत्री म्हणाले. कारण, पुणे पोलिसांच्या तपासावर भाजपकडून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पण तपास योग्य दिशेनं सुरु असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीसांना टोला

सत्तेत कुणी किती लाचारी पत्करली ते इतिहासात लिहिलं जातं, असा टोला फडणवीस यांनी दुपारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना लगावला होता. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “एकतर खोटं बोलून सत्ता आणली आणि सत्ता आल्यानंतर खोट्याचे इमले रचले आणि देश विकायला काढला किंवा देश विकायला काढणारे म्हणून तुमच्याही सरकारची नोंद होईल. याची सुद्धा त्यांनी नोंद ठेवावी आणि आरोप करताना थोडसं जबाबदारीचं भान ठेवावं”, असा सल्ला ठाकरे यांनी फडणवीसांना दिला आहे.

“त्यांची मनस्थिती समजू शकतो. समोर आलेलं एक चांगलं चित्र त्यांनी स्वत:च्याच कर्माने भंग केलं. सरकार पडेल सरकार पडेल असं म्हणत आता वर्ष लोटलं आहे पण ते काही पडत नाही. उलट आता आम्ही अधिक मजबुतीने काम करायला लागलो आहोत. महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जात असताना इतर ठिकाणी त्याचं कौतुक होत आहे. पण तुमच्या मनात जी खदखद आहे ती जरुर काढा. सरकारचं काही चुकत असेल तर जरुर सांगा. पण कारण नसताना केवळ आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची आणि सरकारची बदनामी करु नका”, अशा टोलाही ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

संबंधित बातम्या :

एखाद्याला लटकावयचं, आयुष्यातून उठवायचं असा तपास होता कामा नये; उद्धव ठाकरे यांचा विरोधकांवर निशाणा

‘राजीनामा तुमच्याकडेच ठेवा, राज्यपालांकडे पाठवू नका’, राठोडांचं अजुनही मुख्यमंत्र्यांवर दबावतंत्र

Uddhav Thackeray claims that investigation in Pooja Chavan case is going in the right direction