CM Eknath Shidne Floor Test | कैलास गोरंट्याल अब तक छप्पन्न! बहुमत चाचणीवेळी आमदारांची शेरेबाजी… पहा VIDEO

CM Eknath Shidne Floor Test | विधानसभेत बहुमत चाचणीवेळी कैलास गोरंट्याल यांच्या शेरेबाजीने तणावपूर्ण वातावरणात हशा पिकला

CM Eknath Shidne Floor Test | कैलास गोरंट्याल अब तक छप्पन्न! बहुमत चाचणीवेळी आमदारांची शेरेबाजी... पहा VIDEO
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 04, 2022 | 12:10 PM

मुंबईः विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बहुमत चाचणी झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रत्येक आमदाराला अनुक्रमे नाव आणि सहमती क्रमांक घेण्याची सूचना केली. शिंदेसेना आणि भाजपच्या आमदारांची गणती झाल्यावर महाविकास आघाडी सरकारच्या बाजूच्या आमदारांची गणती सुरु होती. यावेळी जालन्याचे काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी थेट शेरेबाजी सुरु केली. एवढा वेळ शिस्तीत बहुमत चाचणी सुरू असतानाच कैलास गोरंट्याल यांचा नंबर आला आणि त्यांनी मोठ्या आवाजात एकनाथ शिंदे आणि भाजपवर शेरेबाजी सुरु केली. एवढंच नाही तर आपला नंबर सांगताना त्यांनी अब तक छप्पन्न… असा डायलॉगदेखील मारला. त्यामुळे चाचणीवेळी सभागृहात उपस्थित असलेल्यांमध्ये हशा पिकला.

काय म्हणाले कैलास गोरंट्याल?

विधानसभेतील कर्मचारी कैलास गोरंट्याल यांच्या टेबलजवळ मतमोजणीसाठी आले असता, स्वतःचा क्रमांक न उच्चारता, बोलणं सुरु केलं. ते म्हणाले, शेर बोला तो मेरे पिछे ईडी लग जाएगी… ‘राजकारण में साम दाम दंड भेद ये चिजे होती है… लेकिन आज कल… ईडी इन्कम टॅक्स राज्यपाल जरूरी है…’ कैलास गोरंट्याल यांनी बहुमत चाचणीवेळी अचानक शेरेबाजी सुरु केली, यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना केवळ हेड काउंट होईल, अशा सूचना केल्या. गोरंट्याल यांच्या शेरेबाजीमुळे सभागृहात काही क्षण मोठा गोंधळ माजला. तरीही त्यांनी शेर पूर्ण केला. त्यानंतरही ते नाव आणि नंबर उच्चारत नव्हे तेव्हा अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना त्यांना सोडून पुढे नोंदणी सुरु करण्याचे आदेश दिले. तत्पूर्वीच कैलास गोरंट्याल यांनी आणखी एक टोला हाणला… स्वतःचं नाव उच्चारत त्यांचा 56 हा क्रमांक उच्चारताना, अब तक छप्पन्न, असा उल्लेख केला.

एकनाथ शिंदेंनी विश्वासमत जिंकले

विधानसभा अध्यक्षपद जिंकल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विश्वासमत ठराव जिंकला. एकनाथ शिंदे यांना 164 मतं पडली. तर विश्वास ठरावाच्या विरोधात 99 मते पडली. कालप्रमाणे आजही 4 आमदार तटस्थ राहिले. एकनाथ शिंदे यांनी विश्वासमत ठराव जिंकल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी आणि भाजपच्या आमदारांनी बाके वाजवून त्यांचं स्वागत केलं. विश्वास ठराव जिंकल्यानंतर आता शिंदे सरकार अडची वर्षांसाठी आपला कारभार करतील.