Cm Eknath Shinde : कर्जत, अंबरनाथमध्ये ठाकरेंना आणखी एक झटका, नगरसेवकांचं शिंदेंना समर्थन, तर पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे

| Updated on: Jul 11, 2022 | 3:37 PM

त्यांनी शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. त्यामुळे एकीकडे कमी खासदार बैठकीला उपस्थित असताना दुसरीकडे ठाकरेंच्या अडचणी ग्राउंड पातळीवरही वाढत आहेत.

Cm Eknath Shinde : कर्जत, अंबरनाथमध्ये ठाकरेंना आणखी एक झटका, नगरसेवकांचं शिंदेंना समर्थन, तर पदाधिकाऱ्यांचेही राजीनामे
उद्धव ठाकरे,
Image Credit source: Google
Follow us on

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडापासून ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला लागलेली गळती अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये. आधी ठाण्यातले नगरसेवक (Shivsena Corporators) गेले. त्यानंतर नवी मुंबईतील नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. नागपुरातील काही पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर सोलापुरात तेच चित्र दिसलं आणि तेच चित्र आज पुन्हा कर्जत आणि अंबरनाथ मध्ये दिसून आले. या विभागातून एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आणखी वाढला आहे. तर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामेही दिले आहेत. आणि त्यांनी शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. त्यामुळे एकीकडे कमी खासदार बैठकीला उपस्थित असताना दुसरीकडे ठाकरेंच्या अडचणी ग्राउंड पातळीवरही वाढत आहेत. आदित्य ठाकरे ही गळती रोखण्यासाठी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून मैदानात उतरले आहेत.

कर्जत खालापूर मतदारसंघातून पाठिंबा वाढला

आज ठाकरे यांना पहिला झटका बसला तो कर्जत खालापूर मतदारसंघातून, कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतलेल्या राजकीय भूमिका आम्हा सर्वांना मान्य असून त्या भूमिकेच्या समर्थनार्थ आम्ही सर्वजण आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत. असे म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले आहेत. त्यात संतोष भोईर, पंकज पाटील, सुनील ठाकूर, अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यांनी आपले राजीनामे जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्याकडे दिले आहेत.

अंबरनाथमध्ये ठाकरेंना दुसरा झटका

तर दुसरीकडे आमदार बालाजी किणीकर यांच्या मतदारसंघातील पाठिंबाही शिंदे गटाला वाढत आहे. अंबरनाथ महानगरपालिका मधील एकूण नगरसेवकाची संख्या ही 59 आहे. मात्र त्यात शिवसेनेचे 26 नगरसेवक आहेत. त्यातल्या अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रातील 21 नगरसेवक, नगरसेविका आणि दोन स्वीकृत नगरसेवक यांनी कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेत एकनाथ शिंदे यांच्या गटाला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. तसेच त्यांच्या समवेत शेकडो शिवसैनिक व पदाधिकारी देखील शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याही भागात ठाकरे गटाची कोंडी वाढताना दिसतेय.

शिंदे गटाचं पारडं जड

एकीकडे शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचा हा वाद सुप्रीम कोर्टासमोर आणि निवडणूक आयोगासमोर सुरू आहे. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांची गळती सुरू आहे. त्यामुळे ह्या दोन्ही लढाई जिंकण्याचं कठीण आव्हाने ठाकरे गटासमोर असणार आहे. तर शिंदे गटाची ताकद ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सध्या तरी त्यांचं पारड ठाकरे गटापेक्षा कित्येक पटीने जड आहे.