CM Eknath Shinde : ‘संभाजीनगरच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

| Updated on: Jul 15, 2022 | 4:36 PM

शेवटची कॅबिनेट घेतली, 200 - 300 जीआर काढले. कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव. ही कॅबिनेटच बेकायदेशीर होती. त्यामुळे उद्या सकाळी आम्ही अधिकृत कॅबिनेट घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत.

CM Eknath Shinde : संभाजीनगरच्या नावाला स्थगिती नाही, उद्या कॅबिनेटमध्ये अधिकृत निर्णय घेऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा सत्कार केला. त्यावेळी आमदार संदिपान भुमरे यांच्यासह सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील हजारो शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी महत्वाची घोषणा केलीय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होण्यापूर्वी घेतलेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचं (Aurangabad) नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिंदे सरकारकडून या निर्णयाचा स्थगिती देण्यात आलीय. त्यावरुन उद्धव ठाकरे, संजय राऊत, अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केलीय. मात्र, निर्णयाला स्थगिती देण्यामागचं नेमकं कारण शिंदे यांनी आज सांगितलं. तसंच उद्या अधिकृत कॅबिनेट घेऊन आम्ही हा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

बाळासाहेबांच्या मुखातून निघालेलं संभाजीनगर आहे

आम्हाला सावरकरांबाबत बोलता येत नव्हतं. आम्ही जेव्हा हिंदुत्वाची भूमिका घेतली तेव्हा शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. शेवटची कॅबिनेट बेकायदेशीर आहे. जेव्हा सरकार अल्पमतात असतं. आम्ही राज्यपालांना पत्र दिलं होतं की सरकार अल्पमतात आहे. आम्ही कोर्टातही भूमिका मांडली होती. असं असताना कुठलही कॅबिनेट घेता येत नाही. परंतु शेवटची कॅबिनेट घेतली, 200 – 300 जीआर काढले. कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव. ही कॅबिनेटच बेकायदेशीर होती. त्यामुळे उद्या सकाळी आम्ही अधिकृत कॅबिनेट घेऊन या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत. कारण उद्या कुणीही आव्हान दिलं असतं की तुमच्याकडे कॅबिनेट घेण्याचा अधिकारच नाही आणि त्या कॅबिनेटमध्ये तुम्ही नामांतराचा निर्णय घेतला. बाळासाहेबांच्या मुखातून निघालेलं संभाजीनगर आहे. तुम्ही कितीही खोटं सांगण्याचा प्रयत्न केला तरी जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय.

आधी 30 होते, नंतर 50 झाले, मग पळवून कसे नेले?

एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘इकडे म्हणत होते जबरदस्तीने नेले, आधी तीस होते, नंतर पन्नास झाले. मग पळवून कसे नेले. मी नितीन देशमुखला तेव्हाच सांगितलं तू जा, तुला योग्य वाटेल ते कर. शेवटी एक दोन दिवसाचं काम नव्हतं. जे आमदार माझ्यासोबत ते तीन चार लाख लोकांमधून निवडून आले होते. त्यांना योग्य अयोग्य समजत होतं. काही म्हणाले एकनाथ शिंदे राजकीय आत्महत्या करतोय. तेव्हा मी सोबतच्या आमदारांना सांगायचो, मला माझी काळजी नाही, माझ्या राजकारणाची काळजी नाही. मला तुमची काळजी आहे. तेव्हा मी सांगितलं होतं की काही झालंच तर मी सगळा शब्द माझ्यावर घेईल. तुमच्यावर शब्द येऊ देणार नाही’.

‘मी माझ्या डोक्यातून मुख्यमंत्रीपद काढून टाकलं होतं’

लोकशाहीत बहुमताला, नंबरला महत्व असतं. या देशात कायदा, घटना, नियम आहेत. त्याच्याबाहेर तुम्हाला जाता येत नाही. इकडे गटनेते पदावरुन काढायचं आणि तिकडे चर्चेला पाठवायचं. इकडे घरावर दगडफेक करा म्हणायचं. अरे एकनाथ शिंदे हलका वाटला काय. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. पण मला त्या मार्गाला जायचं नव्हतं. त्यांनीही शहाणपणा केला नाही, चांगलं आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी जे शिकवलं त्या मार्गाने आम्ही जात आहोत. माझ्या डोक्यात स्वार्थ नव्हता. सुरुवातीला काय शब्द दिला गेला होता त्यावर मी बोलणार नाही. मी माझ्या डोक्यातून मुख्यमंत्रीपद काढून टाकलं होतं. पण गेल्या अडीच वर्षात आपल्या आमदारांची अवस्था काय झाली. आघाडीत राहून राज्यसभेचा पराभव कसा होतो? आपल्याकडे मतं होती, मग का पडला? याचा विचार, आत्मपरीक्षण करायची गरज होती. विधान परिषदेची निवडणूक होती. आमदारांनी मला विचारलं काय करायचं. मी सांगितलं आपले दोन्ही निवडून आणायचे. आम्ही निवडून आणले. काय वागणूक मिळाली आम्हाला त्यादिवशी? असा सवाल शिंदे यांनी ठाकरेंना केलाय.