Eknath Shinde : ‘मी, फडणवीस, पवार एकत्र आल्यानं…’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान

| Updated on: Oct 20, 2022 | 11:51 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार एकाच व्यासपीठावर! नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

Eknath Shinde : मी, फडणवीस, पवार एकत्र आल्यानं... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सूचक विधान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही (Sharad Pawar) एकाच व्यासपीठावर दिसून आलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना एकच उधाण आलं आहे. एमसीएच्या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सचूक वक्तव्य केलं. मी, फडणवीस पवार एकत्र आल्यानं काहींची झोप उडू शकते, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. ते मुंबईत बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानं एकच हशा कार्यक्रमात पिकला होता.

एमसीएच्या कार्यक्रमात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे आमदारही यावेळी सोबत होते. शिवाय उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे देखील यावेळी एकाच व्यासपीठावर होते.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. शरद पवार यांच्या हजेरीत एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की…

मी, फडणवीस आणि शरद पवार एकत्र असल्यानं काही जणांची झोप उडू शकते. मला आणि फडणविसांना थोडी थोडी बॅटिंग येते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली. त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादानं मॅच जिंकली. काहींचे मनापासून आशीर्वाद होते.

पवार साहेबांचा जन्म साताऱ्याचा आहे… आणि माझा जन्मही साताऱ्याचा आहे. पवारांनी साहेबांनी जे सांगितलं आहे, ते आम्हाला करावंच लागेल. पवार साहेब आपण जे म्हणालात, त्याने आम्हाला आनंद झाला आहे. देवेंद्रजींनाही आनंद झाला आहे. तिकडे आशिषलाही आनंद झाला आहे. काही लोकांची काही लोकांची झोप उडू शकते ना तुमच्या वक्तव्यामुळे! पण त्यांच्या वक्तव्यामुळे आम्हाला आनंद झाला.

पाहा व्हिडीओ :

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येच्या निमित्ताने बुधवारी एका स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत शरद पवार यांनीही स्टेज शेअर केला.

राज्याच्या तीन दिग्गज राजकीय नेत्यांसह भाजप आणि शिवसेनेचे इतर काही महत्त्वाचे नेतेही यावेळी उपस्थित होते. मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, आशिष शेला, प्रताप सरनाईक यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.