‘या नालायकांनी.., ‘दीनानाथ’वर बोलताना वडेट्टीवार चांगलेच भडकले, मंगेशकर कुटुंबावर गंभीर आरोप!

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकारावर बोलताना विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले आहेत.

या नालायकांनी.., दीनानाथवर बोलताना वडेट्टीवार चांगलेच भडकले, मंगेशकर कुटुंबावर गंभीर आरोप!
deenanath mangeshkar hospital vijay wadettiwar
| Updated on: Apr 10, 2025 | 6:23 PM

Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिलेच्या प्रसूतीसाठी तब्बल 10 लाख रुपये अनामत रुक्कम म्हणून मागण्यात आले. योग्य वेळेत उपचार न झाल्याने नंतर या महिलेचा अन्य रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला गेला. या प्रकरणातील डॉक्टराने राजीनामा दिला आहे. मात्र आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे तर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी मंगेशकर कुटुंब हे लुटारुंची टोळी आहे, असं म्हटलंय. ते माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.

त्या माणसाला या नालायकांनी…

“मंगेशकर कुटुंब ही लुटारुंची टोळी आहे. या कुटुंबाने कधी, कुठे दान करताना पाहिलं आहे का? खिलारे पाटलांनी जमीन दिली, त्या माणसाला या नालायकांनी सोडलं नाही. यांच्यात कसली माणुसकी आहे. हे तर माणुसकीला कलंक असलेलं कुटुंब आहे, अशी संतापजनक प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

गरिबांची लूट, शोषण केलं जात असेल तर हे…

“अशा पद्धतीने मॅनेजमेंट चालवले जात असेल, गरिबांची लूट, शोषण केलं जात असेल तर हे कलंक आहे. यांना कोणीही साथ देऊ नये. यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे,” अशी थेट मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा

दरम्यान, राजकीय वर्तुळातही दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील या प्रकरणाला हवा मिळाल्यानंतर रुग्णालयाने काही निर्णय घेतले आहेत. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णांशी कसा संवाद साधावा, यासाठी ट्रेनिंग देण्यात येतंय. तसेच तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील डॉ. सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. नियमानुसार या रुग्णालयावर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.