काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील मध्यरात्री ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंशी दीड तास चर्चा

| Updated on: Nov 01, 2019 | 10:11 AM

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरुन राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपात जोरादर रसीखेच सुरु आहे. अशामध्येच काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी काल (31 ऑक्टोबर) रात्री उशिरा उद्धव ठाकरे यांनी भेट (Ruturaj patil meet uddhav thackeray) घेतली.

काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील मध्यरात्री मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंशी दीड तास चर्चा
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरुन राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपात जोरादर रस्सीखेच सुरु आहे. अशात काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदार ऋतुराज पाटील यांनी काल (31 ऑक्टोबर) रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट (Ruturaj patil meet uddhav thackeray) घेतली. वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानी ऋतुराज यांनी भेट  घेतली. (Ruturaj patil meet uddhav thackeray)

ऋतुराज पाटील रात्री 12 च्या सुमारास मातोश्रीवर पोहोचले आणि रात्री दीडच्या सुमारास ते मातोश्रीतून बाहेर पडले. एकूण दीड तास ऋतुराज पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. मातोश्रीतून बाहेर निघाल्यावर ऋतुराज यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. ही भेट का घेण्यात आली याबद्दल अद्याप काही माहिती समोर आली नाही.

ऋतुराज पाटील हे शिक्षण सम्राट म्हणून ओळख असलेल्या डी. वाय. पाटील यांचे नातू आहेत. विधानसभा निवडणूक 2019 मध्ये पहिल्यांदाच ऋतुराज निवडणूक रिंगणात उतरले होते. तसेच पहिल्याच निवडणुकीत त्यांनी जोरदार विजय ही मिळवला. ऋतुराज पाटील माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज यांना उमेदवारी मिळाली होती. कोल्हापूर दक्षिण हाय-टेन्शन मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. यावेळी ऋतुराज यांच्याविरोधात भाजपचे अमल महाडिक निवडणूक रिंगणात होते. या अटीतटीच्या लढतीत पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. तरुण आमदार म्हणूनही ऋतुराज पाटील यांचे नाव घेतले जाते.

नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. शिवसेना जर आमच्यासोबत आली तर आम्ही त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ, असं दलवाई म्हणाले होते. शिवाय काँग्रेसचे राज्यातील नेतेही शिवसेनेसोबत सत्ता स्थापन्यास इच्छुक आहेत. अशी परिस्थिती असताना, ऋतुराज पाटील हे थेट शिवसेना प्रमुखांच्या भेटीला गेल्याने, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.