काँग्रेस खासदार हुसैन दलवाई संजय राऊतांच्या भेटीला

| Updated on: Nov 06, 2019 | 3:49 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हुसैन दलवाई शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला गेले.

काँग्रेस खासदार हुसैन दलवाई संजय राऊतांच्या भेटीला
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असतानाच एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार हुसैन दलवाई शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला (Husain Dalwai meets Sanjay Raut) गेले. ‘दैनिक सामना’च्या कार्यालयात दलवाई आणि राऊत यांची भेट झाली. महाराष्ट्रात भाजपचं सरकार येऊ नये, अशी आपली इच्छा असल्याचं दलवाईंनी भेटीनंतर सांगितलं.

शिवसेना एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली, तरच काँग्रेस पाठिंबा देईल, अशी अट ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी शरद पवारांसोबतच्या भेटीत घातल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेला सत्तास्थापन करण्यासाठी काँग्रेस सशर्त पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात भाजपचं सरकार येऊ नये, अशी आपली मागणी आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी निर्णय घ्यावा, असं हुसैन दलवाई यांनी राऊतांसोबतच्या भेटीनंतर सांगितलं.

काँग्रेसमधील तरुण आमदारांचा गट शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक आहे. भाजपला सत्ता आणि मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसचे काही आमदार तयार असल्याचं म्हटलं जातं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत झाली होती. या भेटीत महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दोघांमध्ये चर्चा झाली होती. यावेळी सोनिया गांधी यांनी शिवसेनेला सशर्त पाठिंब्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे.

शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेसची नवी अट?

संजय राऊत यांनी सकाळीच शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे मित्रपक्षाशी चर्चा न करणारे शिवसेनेचे संजय राऊत आघाडीच्या नेत्यांसोबत काय खलबतं करत आहेत (Husain Dalwai meets Sanjay Raut), याची उत्सुकता लागली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून 14 दिवस उलटले. मात्र, सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. बहुमत मिळवूनही भाजप-शिवसेना युतीने सत्ता स्थापन केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन खडाजंगी पाहायला मिळत आहे. 9 नोव्हेंबरपर्यंत सत्ता स्थापन करणं आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शरद पवारांनी आपण विरोधात बसणार असल्याचं म्हटलं असलं, तरी त्यांच्या दिल्ली भेटीने अनेक पर्यायांची चाचपणी सुरु असल्याचं दिसतं.

राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. मात्र सेनेला थेट पाठिंबा देणं काँग्रेससाठी अडचणीचं आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा दर्शवला तर अन्य राज्यात त्याचा परिणाम होऊ शकतो.

जर काँग्रेसने बाहेरुन पाठिंबा द्यायचं ठरवलं, म्हणजेच बहुमत चाचणीवेळी जर गैरहजर राहायचं ठरवलं, तरी मोठी अडचण होणार आहे. कारण काँग्रेसकडे 44 आमदारांचं संख्याबळ आहे. जर काँग्रेसचे आमदार बहुमतावेळी गैरहजर राहिले तर 288 वजा 44 म्हणजे 244 वर सदस्यसंख्या येईल. त्यामुळे बहुमताचा आकडा 145 वरुन 123 वर येईल. मात्र शिवसेना+ राष्ट्रावादीचे 56 + 8 अपक्ष + राष्ट्रवादीचे 54 यांचं संख्याबळ 118 पर्यंत पोहोचतं. पण भाजप आणि मित्रपक्षांची संख्या 121 पर्यंत जाते. त्यामुळे काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी बहुमत चाचणीवेळी गैर राहणंही अडचणीचे आहे. शिवसेनेला थेट पाठिंबा देणेही अडचण आणि गैर राहून बाहेरुन पाठिंबा देणेही अडचणीचे आहे.

Husain Dalwai meets Sanjay Raut