कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्र्यांवर घसरायचं? दीपक केसरकर कुणावर संतापले?

| Updated on: Dec 01, 2022 | 3:43 PM

प्रत्येक वाक्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात असतील तर हे योग्य की अयोग्य याचा महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा, असं स्पष्ट मत केसरकरांनी व्यक्त केलं.

कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्र्यांवर घसरायचं? दीपक केसरकर कुणावर संतापले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणेः कुणीही उठायचं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घसरायचं, हे योग्य नाही, अशी संतप्त टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली आहे. पुण्यातील शिरूर येथे ते पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवनेरीवर येऊ दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता.

छत्रपतींचा वारंवार होणार अवमान आम्ही सहन करणार नाहीत, असंही ते म्हणाले होते. मात्र दीपक केसरकर यांनी कोल्हे यांना प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपतींबद्दल काहीच वादग्रस्त बोलले नाहीत, असं केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी तसेच इतरही लहान-मोठ्या पक्षांशी हातमिळवणी केली आहे. त्यावरून दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

ते म्हणाले, एवढे दिवस बाळासाहेबांच्या विचारांवर चालले नाहीत आणि आता त्यांना अनेक विचारांची गरज भासत आहे.

राज्यभर दौरे करणाऱ्या आदित्य आणि उद्धव ठाकरेंचा दीपक केसरकर यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, अडीच वर्ष भेट मिळत नव्हती आता खोके खोके करत राज्यभर फिरत असतात काही गोष्टी ठरवून करण्यात आदित्य ठाकरेच आघाडीवर आहेत..

मागच्या अडीच वर्षात राज्यातल्या समस्यांवर मिटिंग लावू शकले नाहीत. त्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचाही आधिकार नाही. फक्त हिंदुत्वाच्या गप्पा मारायच्या मात्र कृतीतून वेगळंच करायचं अशा शब्दात केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
राज्यपालांकडून छत्रपतींबद्दल विधान निघाले असेल… मात्र राज्यपाल हे भाजपाचे नेते नाहीत, तर ते घटनात्मक पदाचे प्रमुख आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दखल घेतली आहे. त्यामुळे छत्रपतींचा अपमान महाराष्ट्रात सहन करणार नसल्याचे दिपक केसरकरांनी स्पष्ट केले.

छत्रपतींच्या घराण्याचा आदरच आहे. त्यांच्यापुढे नतमस्तकही झालोय. पण छत्रपतींबद्दल बोलत असताना, प्रत्येक वाक्यातून वेगवेगळे अर्थ काढले जात असतील तर हे योग्य की अयोग्य याचा महाराष्ट्राच्या जनतेने विचार करावा, असं स्पष्ट मत केसरकरांनी व्यक्त केलं.