सभागृहात ‘सामना’ वाचत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्ला, पवारांवरील टीकेची आठवण

| Updated on: Dec 18, 2019 | 1:51 PM

देवेंद्र फडणवीसांच्या भाषणादरम्यान सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. शरद पवार हे सभागृहाचे सदस्य नसताना, बाहेरील व्यक्तीबाबत इथे भाष्य करणं योग्य नाही, असं राष्ट्रवादीच्या आमदारांनी नमूद करत फडणवीसांवर आक्षेप घेतला.

सभागृहात ‘सामना’ वाचत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्ला, पवारांवरील टीकेची आठवण
Follow us on

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis attacks CM Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर विधानसभेत टीकास्त्र सोडलं. देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ‘सामना’ वृत्तपत्र वाचून दाखवत, शिवसेनेने शरद पवारांवर केलेल्या टीकेकडे लक्ष वेधलं. इतकंच नाही तर या सरकारला जनादेश नाही, जनादेश भाजपला आहे, स्वार्थासाठी एकत्र आलेल्या तीन पक्षांनी सरकार स्थापन केलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis attacks CM Uddhav Thackeray)

देवेंद्र फडणवीसांच्या भाषणादरम्यान सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. शरद पवार हे सभागृहाचे सदस्य नसताना, बाहेरील व्यक्तीबाबत इथे भाष्य करणं योग्य नाही, असं राष्ट्रवादीच्या आमदारांनी नमूद करत फडणवीसांवर आक्षेप घेतला.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही बाहेरील व्यक्तीबाबत भाष्य करणं अयोग्य असल्याचं म्हटलं. यानंतरही फडणवीसांचं भाषण सुरु झालं.

बाळासाहेबांना शब्द दिला, पण काँग्रेसच्या पाठिंब्याचा दिला का?

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला होता की शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार, पण त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर बनवणार का? हा शब्द दिला होता का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला.

एकनाथ शिंदे यांचं उत्तर

देवेंद्र फडणवीस यांच्या या हल्ल्यानंतर गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिलं. शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरे पहिल्याच दिवशी म्हणाले की मी हा कार्यक्रम टीव्हीवर पाहिला असता. मी अपघाताने मुख्यमंत्री झालो. आमच्या मित्रपक्षांनी जर शब्द पाळला असता, तर ही वेळ आली नसती”

शिंदेंच्या या उत्तरानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या पहिल्या पत्रकार परिषदेची आठवण करुन देत, सर्व पर्याय खुले असल्याचं विधान सांगितलं.

त्यावर एकनाथ शिंदे यांनी गोवा, मणिपूरमध्ये भाजपने काय केलं? अशी विचारणा केली. त्यावर फडणवीसांनी त्या राज्यांमध्ये आम्ही एकत्र लढलो नव्हतो, एकत्र मतं मागितली नव्हती, मात्र महाराष्ट्रात आम्ही एकत्र लढलो, एकत्र मतं मागितली होती, असं म्हणत शिवसेनेवर हल्लाबोल केला.