Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान, चंद्रकांत पाटलांकडून कौतुक; विरोधकांना प्रत्युत्तर

| Updated on: Jul 01, 2022 | 5:55 PM

नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला.

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान, चंद्रकांत पाटलांकडून कौतुक; विरोधकांना प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : ‘भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक आमदार असतानाही हिंदुत्वासाठी लढणाऱ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्याग केला. तसंच नव्या सरकारने चांगल्या रितीने काम करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्यांच्या त्यागाचा भाजपाला अभिमान आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसमोर पक्षशिस्तीचा आदर्श निर्माण केला आहे’ अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव केला. तसंच राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही प्रदेश भाजपातर्फे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. ते मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

‘फडणवीसांच्या त्यागाचा भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान’

चंद्रकांत पाटील म्हणाले की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या आमदारांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने बहुमत गमावले. त्यानंतर भाजपाने पर्यायी सरकार देण्यासाठी पुढाकार घेतला. हिंदुत्व हा भाजपाचा श्वास आणि ध्यास आहे. त्यामुळे हिंदुत्वासाठी लढणारे शिवसैनिक तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांना भाजपाने मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. भारतीय जनता पार्टीकडे 113 आमदार असूनही हिंदुत्वासाठी मुख्यमंत्रिपद सोडताना देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखविला व त्याग केला. त्यांच्या त्यागाचा भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान आहे.

‘सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटेल असं काम करु’

हिंदुत्वाच्या आधारावर स्थापन झालेल्या भाजपा – शिवसेना युतीला जनतेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत दिले. परंतु, शिवसेनेच्या नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी हिंदुत्वाला सोडून अल्पसंख्यांकांचा अनुनय करणाऱ्या पक्षांसोबत आघाडी केली. त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत हिंदुत्व संकटात आले आणि विकासकामे ठप्प झाली. अशा स्थितीत अंतर्गत कलहामुळे आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपाने पर्याय देण्यासाठी पुढाकार घेतला, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार राज्याची विकासकामे गतीने पूर्ण करेल आणि सर्वसामान्य माणसाला अभिमान वाटेल असं काम करेल, असा दावाही पाटील यांनी केलाय.