‘तसा’ एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही, कोकण महोत्सवादरम्यान देवेंद्र फडणवीसांचा शब्द

| Updated on: Dec 06, 2022 | 11:46 AM

कोकण महोत्सवादरम्यान देवेंद्र फडणवीसांचा कोकणवासीयांना शब्द

तसा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही, कोकण महोत्सवादरम्यान देवेंद्र फडणवीसांचा शब्द
Follow us on

मुंबई : मुंबईतील गोरेगावमध्ये कोकण महोत्सव (Kokanmahotsav) सुरु आहे. या महोत्सवादरम्यान संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणवासींना शब्द दिला आहे. “प्रदुषण होईल असा एकही प्रकल्प कोकणात आणणार नाही”, असं फडणवीस म्हणालेत. कोकणात जास्तीत जास्त चांगले प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं आश्वासनही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलं आहे.

कोकणाने काही लोकांना भरभरून दिलं मात्र त्यांनी कोकणासाठी काहीच केलं नाही. मात्र आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचं कोकणाचा विकासाकडे विशेष लक्ष आहे. कोकणाच्या विकासाचं धोरण ते आखत आहेत. कोकणामध्ये नवनवीन योजना सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

कोकणात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला काही लोकांचा विरोध आहे. तर काहींचा पाठिंबा आहे. त्यावर बोलताना फडणवीस यांनी कोकणवासीयांना आश्वासित केलं आहे.

कोकणात येणारा पर्यटक वर्ग मोठा आहे. त्यामुळे पर्यटनाच्या संदर्भातदेखील कोकणातील जलद गतीने प्रकल्प सुरु करण्यात येतील, असंही फडणवीस म्हणालेत.

कधी कधी मला प्रश्न पडतो की कोकणातला आंबा गोडे की कोकणातील लोक गोड आहेत. कोकणातील लोकांशी जर पंगा घेतला तर त्याच्या चार पिढ्या उध्वस्त करतात. चांगल्याला अधिक कसं चांगलं देता येईल एक काम आम्ही करत आहोत. एकही प्रदूषण होणारा उद्योग कोकणात येणार नाही, असा शब्द फडणवीसांनी कोकणवासीयांना दिला आहे.

रिफायनरी संदर्भात पाच हजार एकरामध्ये ग्रीनरी करण्याची अट दिली होती. तिथे जवळपास रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असता. काही लोकांना कोकणाचा विकास नकोय त्यांना कोकण हा मागास ठेवायचा आहे. आम्हाला मात्र कोकणाचा विकास करायचा आहे.त्यादृष्टीने आम्ही पावलं टाकत आहोत. रिफायनरी प्रकल्प हा आम्ही कोकणामध्ये करणार आहोतच आणि जेणे करून लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असं म्हणत रिफायनरी प्रकल्पाबाबत फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.