VIDEO: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

| Updated on: Jul 04, 2021 | 7:35 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची सूचना केली आहे. उद्या सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. (Devendra Fadnavis)

VIDEO: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
Devendra Fadnavis
Follow us on

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची सूचना केली आहे. उद्या सोमवारपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे या अधिवेशनातच विधानसभेचा अध्यक्षपद निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Devendra Fadnavis reaction on maharashtra assembly speaker election)

उद्या होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर साशंकता व्यक्त केली. तुमच्याकडे बहुमत आहे तर एवढं महत्त्वाचं पद रिकामं का ठेवत आहात? ते भरत का नाही? असा सवाल करतानाच आता जी परिस्थिती दिसते, त्यात काही बदल झाला नसेल तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही, असं फडणवीस म्हणाले.

संन्यास घेणार का?, फडणवीस म्हणाले…

तुम्ही संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. त्यावर तुमची राज्याला गरज असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यावर तुमचं काय मत आहे, असं फडणवीस यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी संन्यास घेण्याच्या विधानावर सारवासारव केली. या पुढे मी 25 वर्षे राजकारण करणार आहे. त्यामुळे मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ती विचारपूर्वक बोलतो. मलाही माहीत आहे की, संन्यास घ्यायची गरजच पडणार नाही. कारण जे करण्यासारखं आहे ते हे लोक करतच नाहीये. जे करता येण्यासारखं आहे ते हे सरकार करत नाही म्हणून मी तो विषय बोललो. विचारपूर्वक बोललो, असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील राजकारणाला सर्वांची गरज आहे. माझी गरज आहे, त्यांची गरज आहे. यांची गरज आहे, सर्वांची गरज आहे. राजकारण एकाच पक्षाचं नसतं. राजकारणात सत्ताधारी पाहिजे, विरोधक पाहिजे. सर्व पक्षाचे लोकं पाहिजेत. ठिक आहे. त्यांच्या शुभेच्छा समजूया, असं ते म्हणाले.

तर आठवले मुख्यमंत्री झाले असते

माझं ऐकलं असतं तर फडणवीस मुख्यमंत्री झाले असते, असं रिपाइं नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यावर फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली. रामदासजींनी योग्य वेळी योग्य लोकांचं ऐकलं असतं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, असं फडणवीस म्हणाले.

सरकारचा अधिवेशनातून पळ

आम्हाला जेवढे प्रश्न सभागृहात मांडता येईल तेवढे मांडूच. पण सभागृहात प्रश्न मांडता येत नसेल तर आम्ही माध्यमांसमोर येऊन प्रश्न मांडू. रस्त्यावर उतरू, जनतेच्या फोरममध्ये जाऊ आणि प्रश्न लावून धरू. उद्या जर आंदोलन झालं, तर आंदोलन करतोय म्हणून आम्हाला बोलू नका, असंही ते म्हणाले. आम्ही सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणू या भीतीने सरकारने अधिवेशनातून पळ काढला आहे, अशी टीकाही त्यांनी केली. (Devendra Fadnavis reaction on maharashtra assembly speaker election)

संबंधित बातम्या:

कोरोनाच्या नावाखाली लोकशाहीला कुलुप ठोकली जातेय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

‘अधिवेशनात जे मुद्दे मांडू दिले जाणार नाहीत ते जनतेच्या फोरमवर जाऊन मांडू’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

प्रसिद्धी मोहिमेवर ठाकरे सरकारकडून 155 कोटी खर्च, सोशल मीडियावर 6 कोटींचा खर्च

(Devendra Fadnavis reaction on maharashtra assembly speaker election)