माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचं समन्स

| Updated on: Nov 29, 2019 | 10:07 AM

2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आलं

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचं समन्स
Follow us on

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर सत्र न्यायलयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स (Devendra Fadnavis summonned) बजावण्यात आलं आहे. नागपूर पोलिसांनी काल (गुरुवारी) फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स पाठवलं.

या प्रकरणाबाबत खुलासा न केल्याच्या आरोपाखाली दंडाधिकारी न्यायालयाकडे एक नोव्हेंबरला फौजदारी कारवाई करण्याचा अर्ज दाखल झाला होता. वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई सुरु करण्याची मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल केला होता.

एकीकडे महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालेलं असतानाच योगायोगाने त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरी समन्स धडकलं.

सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्यांची माहिती लपवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

ऐंशी वर्षांचा पैलवान मुख्यमंत्री ठरवतो, बारामतीत फडणवीसांना पोस्टरमधून टोले

या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाने उके यांची याचिका फेटाळताना कनिष्ठ न्यायालयाचा पूर्वीचा आदेश कायम ठेवला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाचा निकाल बाजूला ठेवत फडणवीस (Devendra Fadnavis summonned) यांच्याविरोधातील तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली होती.