स्वतःची किंमत वाढवण्यासाठी अजित पवारांवर टीका; धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थिमध्ये जर अजित पवारांच्या हाती राज्य दिले तर ते चार दिवसांत विकून मोकळे होतील, अशी घणाघाती टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली होती. गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

स्वतःची किंमत वाढवण्यासाठी अजित पवारांवर टीका; धनंजय मुंडेंचा पडळकरांना टोला
धनंजय मुंडे
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 6:33 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थिमध्ये जर अजित पवारांच्या हाती राज्य दिले तर ते चार दिवसांत विकून मोकळे होतील, अशी घणाघाती टीका भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी केली होती. गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. गोपीचंद पडळकर यांचे अजितदादांवरील आरोप म्हणजे कसलीही किंमत नसलेल्या व्यक्तीने स्वतःची किंमत वाढवण्यासाठी आणि सवंग प्रसिद्धीसाठी केलेला भाबडा प्रयत्न असल्याचा टोला मुंडे यांनी लगावला आहे. अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले असताना मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आरक्षणावर केंद्राची भूमिका दुटप्पी 

दरम्यान त्यांनी यावेळी पंकजा मुंडे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. ताई आणि दादा यांच्यात पहिला नंबर कुणाचा? असा प्रश्न धनंजय मुंडे यांना विचारला असता, “माझा नंबर शून्य आहे, ज्याच्या मागे लावाल त्याची किंमत वाढेल” असं त्यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षणावर बोलताना ते म्हणाले की,  महाराष्ट्राच्या प्रश्नाबाबत केंद्रानं भूमिका घेतली नव्हती, मात्र तोच प्रश्न मध्य प्रदेशातही उद्भवला, तिथे भाजपची सत्ता असल्यानं केंद्र सरकारला जाग आली आणि आता आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याची भूमिका केंद्रानं घेतली, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

काय म्हणाले होते पडळकर?

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेत विविध विषयांवरून जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षा घोटाळा, शेतकरी मदत, एसटी कर्मचारी आंदोलन, आदी मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला. अशावेळी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत राज्याच्या कारभार आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी अजित पवारांकडे कारभार देण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, अजित पवारांच्या हातात राज्य दिलं तर ते चार दिवसांत विकून खातील, अशी जळजळीत टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

संबंधित बातम्या

Dhananjay Munde: दिव्यांगांचे शिक्षण व विकासाचा बृहत आराखडा एक महिन्यात सादर होणार, धनंजय मुंडे यांची विधानसभेत माहिती

Muslim Reservation : 5 टक्के मुस्लीम आरक्षणाचा पाठपुरावा करा, नसीम खान यांचं बाळासाहेब थोरातांना पत्र

Winter Session : ठाकरे सरकारचा विधानसभेत आज पुन्हा असंविधानिक निर्णय, आशिष शेलारांचा आरोप