Goa CM Pramod Sawant : आधी राज्याभिषेक योगींचा, मगच सावंतांचा; गोव्यात उशिरा सत्ता स्थापनेमागचं कारण काय?

| Updated on: Mar 22, 2022 | 10:36 AM

डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडेच गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्याचा निर्णय झाल्यानंतरही सावंत यांचा शपथविधी सोहळा लांबणीवर गेला आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरच सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

Goa CM Pramod Sawant : आधी राज्याभिषेक योगींचा, मगच सावंतांचा; गोव्यात उशिरा सत्ता स्थापनेमागचं कारण काय?
आधी राज्याभिषेक योगींचा, मगच सावंतांचा; गोव्यात उशिरा सत्ता स्थापनेमागचं कारण काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पणजी: डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांच्याकडेच गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देण्याचा निर्णय झाल्यानंतरही सावंत यांचा शपथविधी सोहळा लांबणीवर गेला आहे. योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरच सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना सावंत मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सावंत मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी पुन्हा एकदा आमदारांची मोर्चेबांधणी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सावंत सरकारचा येत्या 23 किंवा 24 मार्च रोजी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर भव्य शपथविधी सोहळा होणार होता. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरूही होती. सरकार स्थापनेसाठी सावंत यांनी राज्यपालांची भेटही घेतली होती. मात्र, खुद्द पंतप्रधान आणि वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांना या सोहळ्याला उपस्थित राहता यावे म्हणून हा शपथविधी सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधीला उपस्थित राहावे अशी गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि स्थानिक नेत्यांची आग्रहाची विनंती आहे. पण, 23 तारखेला उत्तराखंडचे मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. 25 तारखेला उत्तरप्रदेशमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे, गोव्याचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उत्तरप्रदेश शपथविधींनंतर म्हणजेच 26 किंवा 27 मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 23 किंवा 24 मार्चला हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती होती.

मोदी, शहा, नड्डांची उपस्थिती

दरम्यान, 26 किंवा 27 मार्च रोजी ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवरच सावंत यांचा शपथविधी होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय नेते जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घोषणा

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपनं पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तसंच अपक्ष मिळून भाजपकडे सध्या 25 आमदारांचं संख्याबळ आहे. अशावेळी भाजप सत्तास्थापन करणार हे स्पष्ट होतं. मात्र, विश्वजीत राणे यांची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा समोर आल्यानं गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न विचारला जात होता. याबाबत राजधानी दिल्लीत बैठकांचं सत्रंही पार पडलं. त्यानंतर काल अखेर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत विश्वजीत राणे यांनीच प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि तो एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती पर्यवेक्षक नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आल्यानंतर प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

 

संबंधित बातम्या:

Goa CM Pramod Sawant : गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा प्रमोद सावंत, विश्वजीत राणेंनीच मांडला प्रस्ताव!

Uttarakhand CM : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा पुष्कर सिंह धामी, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

भाजपकडून चारही राज्यात विद्यमान मुख्यमंत्र्यांनाच पुन्हा संधी! कोणत्या राज्यात मुख्यमंत्रीपदी कोण?