Eknath Shinde: शिंदे गटाची गुवाहटीतच दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक, 4 प्रमुख मुद्दे बैठकीत चर्चेला असणार

| Updated on: Jun 25, 2022 | 12:42 PM

शिंदे गटाकडे आमदारांचं मोठं संख्याबळ असलं तरीही शिवसेनेनं निलंबनाचं हत्यार उगारल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. यातून मार्ग कसा काढायचा आणि महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होत असताना नेमकी काय भूमिका बजावायची, आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर गुवाहटीत चर्चा होत आहे.

Eknath Shinde: शिंदे गटाची गुवाहटीतच दुपारी दोन वाजता महत्वाची बैठक, 4 प्रमुख मुद्दे बैठकीत चर्चेला असणार
एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या गटातील इतर शिवसेना आमदारांची महत्त्वाची बैठक आज गुवाहटीत (Guwahati) होत आहे. दुपारी दोन वाजता बैठकीला सुरुवात होईल. गुवाहटीतील हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये मागील चार दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या शिंदे गटातील 16 आमदारांवर (Shiv Sena MLA) निलंबनाची टांगती तलवार आहे. शिंदे गटाकडे आमदारांचं मोठं संख्याबळ असलं तरीही शिवसेनेनं निलंबनाचं हत्यार उगारल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. यातून मार्ग कसा काढायचा आणि महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होत असताना नेमकी काय भूमिका बजावायची, आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर गुवाहटीत चर्चा होत आहे. गुवाहटीत असलेल्या टीव्ही9 च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या बैठकीत प्रमुख 4 मुद्दे चर्चिले जातील. ते पुढील प्रमाणे-

1. बंडखोर आमदारांचं निलंबन :

शिवसेनेने पक्षादेश न पाळल्यामुळे जवळपास 16 आमदारांना शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. त्यांचं निलबंन रद्द करण्यासाठी कारवाई सुरु केली आहे. यासंदर्भातील पत्र शिवसेनेने विधानसभेच्या उपाध्यक्षांना दिलं आहे. त्यामुळे शिंदे गटासमोरील या क्षणाचं हे सर्वात मोठं आव्हान आहे. याला कायदेशीर रित्या कसं सामोरं जावं, यासंबंधीची चर्चा आज गुवाहटीत होणाऱ्या बैठकीत केली जाईल. विशेष म्हणजे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. बंडखोर एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याचा उपाध्यक्ष यांना अधिकार राहिलेला नाही, असे स्मरणपत्र 2 अपक्ष आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांना शुक्रवारी दिले आहे.

2. पुढची कायदेशीर लढाई –

आम्हीच शिवसेना असा दावा करून महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला एकनाथ शिंदे गटानं आव्हान दिलं आहे. आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ असल्याचाही दावा शिंदे गटातर्फे केला जातोय. मात्र राज्य घटनेनुसार, शिवसेना पक्षाअंतर्गत एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेत अस्तित्व दाखवता येणार नाही, असं जाणकारांचं मत आहे. त्यांना शिवसेना नको असेल तर दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल, हाच एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. यासंबंधी पुढील कायदेशीर लढाईवरही गुवाहटीतील बैठकीत चर्चा होईल.

3. महाशक्तीसोबतची चर्चा –

राष्ट्रीय पक्षाचं आपल्याला संरक्षण असून त्यांचा पुढील संदेश येईल, त्यानुसार गुवाहटीतील आमदार पुढची रणनीती आखतील, असं एकनाथ शिंदे काल म्हणालेत. आतापर्यंत भाजपशी आपला काहीही संपर्क नाही. किंवा त्यांच्याकडून काहीही प्रस्ताव आलेला नाही, असं सांगणारे एकनाथ शिंदे वारंवार महाशक्ती, राष्ट्रीय पक्ष असा उल्लेख करत आहेत. थेट भाजपचा उल्लेख त्यांनी टाळलाय. पण या महाशक्तीसोबत काय चर्चा करायची, यावरही गुवाहटीतील बैठकीत रणनीती आखली जाईल.

4. उद्धव ठाकरेंच्या निर्णयांवर चर्चा-

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दुपारी एक वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेनेतील महत्त्वाचे पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मातोश्रीवरून उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीला संबोधित करतील. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतर्फे आज एकनाथ शिंदे यांना नेते पदावरून हटवण्यात येईल, अशी चर्चा आहे. असं झाल्यास शिवसेना म्हणून पुढील भूमिका मांडू पाहणाऱ्या एकनाथ शिंदे यांचे बहुतांश अधिकार संपुष्टात येतील. त्यामुळे बैठकीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील, तसेच त्यांनी आतापर्यंत आमदारांना केलेल्या आवाहानांना कसा प्रतिसाद द्यायचा, आदी गोष्टींबाबत गुवाहटीतील बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.