शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर आज कोणती चिन्ह सादर केली? उत्तर मिळालं!

| Updated on: Oct 11, 2022 | 10:19 AM

शिंदे गटाला कोणतं चिन्ह निवडणूक आयोग देणार? आजच स्पष्ट होणार! मशालीला कोणत्या चिन्हाने उत्तर?

शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर आज कोणती चिन्ह सादर केली? उत्तर मिळालं!
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
Follow us on

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली : एकनाथ शिंदे गटाकडून (Eknath Shinde group) निवडणूक आयोगासमोर (Election Commission) नव्याने 3 चिन्ह सादर करण्यात आली. आज सकाळी 10 वाजण्याच्या आधी तीन नवी चिन्ह सादर शिंदे गटाकडून सादर करण्यात आली आहेच. ही चिन्ह कोणती होती, याचंही उत्तर आता मिळालंय. शिंदे गटाच्या वतीने शंख, रिक्षा आणि तुतारी ही चिन्ह सादर करण्यात आली. ई-मेल (E-mail) द्वारे हे पर्याय शिंदे गटाच्या वतीने सादर करण्यात आले आहेत.

सोमवारी शिंदे गटाने दिलेले दोन पर्याय फेटाळण्यात आले होते. तर उरलेला एक पर्याय आधीच दुसऱ्या एका राजकीय पक्षाकडे असल्यानं हा पर्यायही नाकारण्यात आला होता. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने आज नव्यानं तीन पर्याय शिंदे गटाला द्यावे लागणार होते. सकाळी 10 वार्जेपर्यंत हे पर्याय सादर करण्याची मुदत शिंदे गटाला देण्यात आली होती.

याआधी शिंदे गटाकडून गदा, त्रिशूळ आणि उगवता सूर्य अशी तीन चिन्ह सादर करण्यात आलेली होती. यातील गदा आणि त्रिशूळ ही चिन्ह धार्मिक प्रतिकं असल्यानं ती नाकारण्यात आली होती. तर डीएमके पक्षाचं चिन्ह उगवता सूर्य असल्यानं तेही मान्य करण्यात आलं नव्हतं. त्यानंतर आता नव्याने तीन पर्याय शिंदे गटाकडून सादर करण्यात आलेत. या तीनपैकी कोणतं चिन्ह शिंदे गटाला निवडणूक आयोग देतं, हे आजच स्पष्ट होण्याची शक्यताय.

याआधी सोमवारी शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या नावाबाबत निर्णय घेतला होता. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना, असं नाव शिंदे गटाच्या वतीने देण्यात आलंय. तर ठाकरे गटाला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, असं नाव देण्यात आलं. दरम्यान, सोमवारी ठाकरे गटासाठी मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. मात्र सोमवारी शिंदे गटाच्या निवडणूक चिन्हाचा निर्णय होऊ शकला नव्हता.

दरम्यान, चिन्ह जे मिळेल, ते आम्हाला मंजूर आहे, असं ठाण्याचे माजी महापौर आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलंय. आम्हाला जे नाव मिळालंय. त्यानेच आम्ही समाधानी आहोत, असं म्हस्के म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीसोबत बोलत होते.