Eknath Shinde : सुरतमध्ये नेमकं काय करतायत एकनाथ शिंदे? भाजप नेत्यांसोबत बैठका, आणखी काय काय?

| Updated on: Jun 21, 2022 | 10:12 AM

एकिकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सोमवारी रात्रीपासून सुरु आहे, तसं सूरतमध्ये या हॉटेलमध्ये हालचालींना वेग आलाय.

Eknath Shinde : सुरतमध्ये नेमकं काय करतायत एकनाथ शिंदे? भाजप नेत्यांसोबत बैठका, आणखी काय काय?
Follow us on

मुंबईः सोमवारी एकिकडे विधानभवनात विधान परिषदेचा (MLC Election) निकाल लागत होता आणि तिकडे महाविकास आघाडीच्या तीन पक्षांच्या सरकारच्या पायाखालची जमीन हादरत होती. अखेर निकाल लागला आणि ज्याची शक्यता वाटत होती, तेच घडू लागलं. शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकाएकी नॉट रिचेबल झाले. काही वेळानं कळलं की त्यांच्यासोबत 11 शिवसेना आमदारही (ShivSena MLA) गायब आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले एकनाथ शिंदे गुजरात राज्यात सूरतमध्ये गेल्याची माहिती उघड झाली असून ते सूरतमध्ये नेमकं काय करतायत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकिकडे विधान परिषदेत भाजपचं संख्याबळ वाढल्याने शिवसेनेची धाकधूक वाढू लागली तर भाजपलाही सरकारला अस्थिर करण्यासाठीचं शस्त्र मिळालं. त्यामुळे गुजरातमधील भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सध्या हॉटेल ली मेरिडियन येथे मुक्कामी असून सोमवारी रात्रीपासूनच भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदेंनी 11 आमदारांसह बंड पुकारलं तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास वेळ लागणार नाही, या भीतीनं महराष्ट्रात चर्चांना उधाण आलंय. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा सध्या गुजरातच्या दिशेनं खिळल्या आहेत.

काय सुरु आहे गुजरातमध्ये?

गुजरातमधील हॉटेल ली मेरिडियन येथे एकनाथ शिंदे कालपासून मुक्कामी गेले आहेत. त्यांच्यासोबत 11 शिवसेना आमदारांची फौज असल्याचं म्हटलं जातंय. तसेच काल रात्रीपासून गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या संपर्कात असून

सुपर सीएमच्या मदतीनं खलबतं!

महाराष्ट्रात इकडे देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा दिसतो तसा गुजरातमध्ये सी आर पाटील यांचा चमत्कार पहायला मिळतो. गुजरातमध्ये त्यांना सुपर सीएम मानलं जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय असून पक्ष संघटनात, सरकार चालवण्यात अत्यंत चाक्षाण. प्रादेशिकता, जातीयवादातून बाहेर येऊन राजकारण करणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. गुजरातमध्ये याच सीआर पाटील यांच्याशी एकनाथ शिंदे संपर्कात असून महाराष्ट्र भाजपाच्या मदतीनं महाविकास आघाडीत मोठा भूकंप आणण्याच्या हालचाली गुजरातेत सुरु असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिंदेंसोबत कोणते आमदार नॉटरिचेबल?

एकनाश शिंदेंचा पत्ता गुजरातमध्ये सापडला तसा त्यांच्यासोबत नॉट रिचेबल झालेल्या आमदारांचाही ठावठिकाणा हळू हळू लागतोय. आज महाराष्ट्रात नॉट रिचेबल असलेल्या आमदारांची मोठी यादी तयार झाली आहे. मात्र यापैकी एकनाथ शिंदेंसोबत कोण कोण आहेत, ते पुढच्या काही तासात उघड होईल. महाराष्ट्रातून नॉट रिचेबल असलेले आमदार पुढील प्रमाणे-

  1. शहाजी बापू पाटील
  2. महेश शिंदे सातारा
  3. भरत गोगावले
  4. महेंद्र दळवी
  5. महेश थोरवे
  6. विश्वनाथ भोईर
  7. संजय राठोड
  8. संदीपान भुमरे
  9. उदयसिंह राजपूत
  10. संजय शिरसाठ
  11. रमेश बोरणारे
  12. प्रदीप जैस्वाल
  13. अब्दुल सत्तार

सूरतच्या हॉटेलबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त

महाराष्ट्रात राजकीय भूकंप आणण्याची खलबतं जिथं सुरू आहेत, त्या सूरतमधील हॉटेल ली मेरिडियन इथं पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. एकिकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर महाविकास आघाडीच्या बैठकांचं सत्र सोमवारी रात्रीपासून सुरु आहे, तसं सूरतमध्ये या हॉटेलमध्ये हालचालींना वेग आलाय. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुजरात सरकारतर्फे मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.