फडणवीस-महाजनांमुळे माझं तिकीट कापलं, खडसेंच्या आरोपावर गिरिश महाजन म्हणतात…

| Updated on: Jan 02, 2020 | 5:34 PM

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपले तिकीट कापण्याला देवेंद्र फडणवीस आणि गिरिश महाजन यांना जबाबदार धरले. यानंतर भाजपमध्ये चांगलीच खळबळ माजली (Girish Mahajan on allegations of Eknath Khadse).

फडणवीस-महाजनांमुळे माझं तिकीट कापलं, खडसेंच्या आरोपावर गिरिश महाजन म्हणतात...
Follow us on

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपले तिकीट कापण्याला देवेंद्र फडणवीस आणि गिरिश महाजन यांना जबाबदार धरले. यानंतर भाजपमध्ये चांगलीच खळबळ माजली (Girish Mahajan on allegations of Eknath Khadse). आता अनेक नेते यावर स्पष्टीकरण देत फडणवीसांची बाजू घेताना दिसत आहेत. गिरिश महाजन यांनी देखील त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. नाथाभाऊंना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. आम्ही असा कुठलाही विरोध आम्ही केला नाही, असं मत गिरिश महाजन यांनी व्यक्त केलं (Girish Mahajan on allegations of Eknath Khadse).

गिरिश महाजन म्हणाले, “नाथाभाऊंना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. आम्ही त्यांच्या तिकिटाला कोणताही विरोध केला नाही. राज्यात इतरही मंत्र्यांचे तिकीट कापले गेले. हा तिकिट कापण्याचा निर्णय केंद्रीय कमिटीचा होता. येथे उगाच कुणीतरी सांगितलं याला अर्थ नाही. याबाबत मी नाथाभाऊंशी बोलेन.”

एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांची निश्चित चौकशी झाली पाहिजे. चौकशीत कोण दोषी आहे स्पष्ट होईल. मात्र, आम्ही याबाबत काहीही बोललेलो नाही. त्यामुळे आमच्यावर आरोप करणं चुकीचं आहे. तिकिटाचे सर्व निर्णय केंद्रीय निवड समितीचे होते, असंही गिरिश महाजन यांनी नमूद केलं.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरिश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते, “पक्षाने माझं तिकीट का नाकारलं हे मला कळलं नाही. पक्षाला माझ्याबाबत कुठलाही आक्षेप नाही, मात्र कोअर कमिटीच्या मिटींगमध्ये देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मला तिकीट देण्यात आलं नाही. नाराजी काय आहे हे मला सांगण्यात आलेलं नाही, म्हणून मी त्याविषयी पक्षश्रेष्ठींकडे कारवाईची मागणी केली आहे.”

तुम्हाला दुसऱ्या पक्षातील नेते चालतात, मग नाथाभाऊ का चालत नाही, याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही. रोहिणी खडसेंना पाडण्याबाबतचे पुरावे माझ्याकडे आहेत, त्याची नोंद पक्षाने घेतली आहे, असं खडसेंनी स्पष्ट केलं आहे.