राज्य सरकारनं झोपेचं सोंग घेतलंय, पीक विम्यावरुन केळी उत्पादकांची दिशाभूल, गिरीश महाजनांची घणाघाती टीका

| Updated on: Nov 09, 2020 | 7:33 PM

राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असून, शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. (Girish Mahajan criticize State Govt for banana farmers crop insurance issue)

राज्य सरकारनं झोपेचं सोंग घेतलंय, पीक विम्यावरुन केळी उत्पादकांची दिशाभूल, गिरीश महाजनांची घणाघाती टीका
Follow us on

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. केळी पीक विम्याचे निकष केंद्र सरकारने बदलले आहेत, अशी चुकीची माहिती राज्य सरकारकडून पसरवली जात आहे. राज्य सरकार एक प्रकारे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळत असून, शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, अशी टीका भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. “धक्कादायक बाब म्हणजे, राज्य सरकारने केळी पीक विम्याचा 128 कोटी रुपयांचा हिस्सा देखील भरलेला नाही. या सरकारने झोपेचं सोंग घेतले आहे,” अशी टीका गिरीश महाजन यांनी किसान मोर्चावेळी केली. (Girish Mahajan criticize State Govt for banana farmers crop insurance issue)

जळगावात आज दुपारी भाजपच्यावतीने केळी पीक विम्याच्या मुद्द्यावरून भव्य किसान मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावेळी गिरीश महाजन बोलत होते. केळी पीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणे करावेत, या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा काढण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर सभा पार पडली. या सभेला भाजपच्या नेत्यांनी संबोधित केले.

राज्यातील सुमारे 80 हजार केळी उत्पादक शेतकर्‍यांचा केळी पीक विम्याचा मुद्दा रखडला आहे. राज्य सरकारने यावर्षी केळी पीक विम्याचे निकष बदलले आहेत. हे निकष अन्यायकारक असल्याने एकाही शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळू शकणार नाही. भाजपकडून केळी एक विम्याच्या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र, राज्य सरकार लक्ष देत नाही, असं टीकास्त्र गिरीश महाजन यांनी सोडले.

खासदार  रक्षा खडसेंचे टीकास्त्र

केळी पीक विम्याच्या प्रश्नी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. राज्यातील सुमारे 80 हजार केळी उत्पादक शेतकऱ्यांशी निगडित हा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. केळी पीक विम्याचे निकष ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारचा आहे. परंतु, केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहे, असा आरोप रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी केला.

आम्ही सर्व कागदपत्रे जनतेस उपलब्ध करून देण्यास तयार आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी याप्रश्नी जाहीर चर्चेस यावे, असे आव्हान खासदार रक्षा खडसेंनी दिले.आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून आकाशवाणी चौकापर्यंत पायी मोर्चा काढला. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे त्याचप्रमाणे इतर नेतेमंडळी बैलगाडीमध्ये बसली होती. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रास्तारोको आंदोलन करत महामार्ग रोखून धरला. अर्धा तास झाल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.

संबंधित बातम्या :

महाविकासआघाडीचे सरकार म्हणजे तीन तिघाडा, काम बिघाडा, गिरीश महाजनांचं टीकास्त्र

Girish Mahajan | ठाकरे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचं : गिरीश महाजन

(Girish Mahajan criticize State Govt for banana farmers crop insurance issue)