जळगावात भाजपला अजून एक मोठा झटका बसणार? एकनाथ खडसेंच्या दाव्यानं खळबळ

| Updated on: Jun 30, 2021 | 7:49 PM

भाजपचे 8 नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय. यापूर्वी 27 नगरसेवक फुटले. त्या गटासोबत हे 8 नगरसेवक फुटून जाणार आहेत, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

जळगावात भाजपला अजून एक मोठा झटका बसणार? एकनाथ खडसेंच्या दाव्यानं खळबळ
एकनाथ खडसे
Follow us on

जळगाव : भाजपचे अजून 8 नगरसेवक नाराज आहेत. हे नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिलाय. यापूर्वी 27 नगरसेवक फुटले. त्या गटासोबत हे 8 नगरसेवक फुटून जाणार आहेत, असंही एकनाथ खडसे म्हणाले. खडसेंच्या या दाव्यामुळे जळगाव भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. खडसेंचा हा दावा खरा ठरला तर तो भाजप आणि गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का असेल. (Eknath Khadse claims that 8 more corporators of Jalgaon Municipal Corporation are in touch)

जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता होती. मात्र, 27 नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करुन शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे सत्तांतर होऊन शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला. महत्वाची बाब म्हणजे जळगाव महापालिकेत महापौर आणि विरोधी पक्षनेतेही शिवसेनेचे आहेत. महापौर जयश्री महाजन या आहेत, तर त्यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते आहेत.

जळगाव महापालिकेवर सत्ता असताना आम्ही महापालिका कर्जमुक्त केली अशी घोषणा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली होती. मात्र, आज प्रत्यक्षात महापालिकेवर 125 कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यामुळे त्यांनी जळगावकरांची फसवणूक केली आहे, असा आरोपही खडसे यांनी महाजनांवर केलाय.

जळगाव महानगरपालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ
एकूण नगरसेवक: 80

भाजप : 57
शिवसेना : 15
एमआयएम : 3
स्विकृत नगरसेवक : 5 (मतदानाचा हक्क नाही)

एकनाथ शिंदे-गुलाबराव पाटलांचे डावपेच

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे महापालिकेची जबाबदारी सोपवली होती. मात्र, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांनी राजकीय डावपेच आखत भाजपच्या 27 नगरसेवकांना आपल्याकडे ओढण्यात यश मिळवले होते.

बंडखोर नगरसेवक थेट ठाण्यात

विशेष म्हणजे हे 27 नगरसेवक शिंदे यांना भेटण्यासाठी ठाण्यात दाखल झाले होते. हे नगरसेवक ठाण्यातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. हे नगरसेवक स्वत:च्या मर्जीने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना भेटायला आल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले होते.

निधी नसल्यामुळेच नगरसेवकांचं बंड?

पालिकेत सत्ता आल्यानंतरही जळगाव पालिकेला भाजपच्या काळात निधी मिळाला नाही. आताही वर्षभरात केंद्राचा निधी वगळता जळगाव पालिकेला निधी मिळाला नाही. त्यातच कोरोनामुळे पालिकेला आर्थिक चणचण भासत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक बेचैन होते. भाजपच्या नगरसेवकांची हीच बेचैनी हेरून शिंदे-पाटील यांनी या नगरसेवकांभोवती जाळं फेकलं आणि त्यात हे नगरसेवक सापडल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

संबंधित बातम्या :

एकाच घरात विरोधक-सत्ताधारी, पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेता, दोघं शिवसैनिक, जळगावातील अनोखं राजकारण

मुक्ताईनगरच्या भाजप नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश नक्की धक्का कोणाला? खडसेंच्या वक्तव्याने खळबळ

Eknath Khadse claims that 8 more corporators of Jalgaon Municipal Corporation are in touch