अजितदादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख, त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार : जयंत पाटील

| Updated on: Aug 12, 2020 | 9:42 PM

शरद पवारांनी पार्थ पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवार नाराज नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं (Jayant Patil reaction on Sharad Pawar criticize Parth pawar).

अजितदादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख, त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार : जयंत पाटील
Follow us on

मुंबई : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आमच्या कुटूंबाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना कुटुंबातील प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार आहे. त्यात वावगं असं काही नाही. त्यामुळे याबाबत अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे (Jayant Patil reaction on Sharad Pawar criticize Parth pawar).

पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना शरद पवार यांनी पार्थ पवारांवर टीका केली. “माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे”, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी प्रसारमाध्यमांसमोर नातवाला फटकारल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची पाठराखण केली. त्यामुळे राजकीय वातावरणात याविषयावर विविध चर्चांना उधाण आलं. दरम्यान, पार्थ पवारांवर टीका केल्यानंतर शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

हेही वाचा : पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार

‘सिल्व्हर ओक’वरील बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मात्र, अजित पवार कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेले. दरम्यान, पार्थ पवारांवरील टीकेवर अजित पवार नाराज नसल्याचं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं (Jayant Patil reaction on Sharad Pawar criticize Parth pawar).

“आमची सिल्व्हर ओकवर ठरलेली बैठक होती. पार्थ संबंधित कोणताही विषय चर्चेत आला नाही. पार्थ यांचं विधान त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण याबाबत कोणताही कौटुंबिक वाद नाही. पवार कुटुंबात कोणतेही वाद नाहीत”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

“अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी राष्ट्रवादीची भूमिका याआधीच स्पष्ट केली आहे. पक्षात कोणताही वाद नाही. आजची बैठक ही पूर्वनियोजित होती. मंत्रीमंडळ बैठकीदरम्यान अजितदादा नाराजीमुळे बैठक सोडून गेले नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनेच अजितदादा बैठकीतून निघाले”, असं जयतं पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या :

शरद पवार म्हणाले, तो इमॅच्युर, आता पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया…..

पवारांनी नातवाला इमॅच्युअर म्हटलं, आता नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण

संबंधित व्हिडीओ :