Jayant Patil : राज ठाकरेंची सभा ही उत्तर सभा नाही तर उतारा सभा! जयंत पाटलांचा जोरदार टोला

| Updated on: Apr 13, 2022 | 4:32 PM

राज ठाकरे यांच्या टीकेला खुद्द शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे यांनी सभा ही उत्तर सभा नाही तर उतारा सभा होती, असा जोरदार टोला जयंत पाटील यांनी राज यांना लगावलाय.

Jayant Patil : राज ठाकरेंची सभा ही उत्तर सभा नाही तर उतारा सभा! जयंत पाटलांचा जोरदार टोला
जयंत पाटील, राज ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या सभेनंतर ठाण्यातील उत्तर सभेतही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच राज्यात जातीवाद बोकाळला. शरद पवार हे आपल्या प्रत्येक सभेची सुरुवात शाहू, फुले, आंबेडकरांचं नाव घेऊन करतात. ते योग्यच आहे. मात्र पवार छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव कधीही घेत नाहीत. कारण त्यांना मुस्लिम मतं दुरावण्याची भीती वाटते, असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. तर जयंत पाटील (Jayant Patil) यांचा उल्लेख जंत पाटील असा केला होता. राज ठाकरे यांच्या टीकेला खुद्द शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे यांनी सभा ही उत्तर सभा नाही तर उतारा सभा होती, असा जोरदार टोला जयंत पाटील यांनी राज यांना लगावलाय.

जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राला माहिती आहे की सर्व समाजाला सोबत घेऊन पवार साहेबांनी समाजकारण आणि राजकारण उभं केलं. जातीपातीचं राजकारण पवारांनी कधीही केलं नाही. राज ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सभा घेणार नाहीत. तर पक्ष संघटना आणि राज्याच्या, देशाच्या प्रश्नावर उहापोह केला जाणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. तसंच राज ठाकरे यांची ही सभा राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करण्यासाठी घेतलेली उतारा सभा होती, असा टोलाही पाटील यांनी लगावलाय.

‘रेटिंग वाढवणे हा त्यांच्या राजकारणाचा भाग’

आमच्याबाबत कशाप्रकारे बोलतात त्यानुसार त्यांची किंमत वाढत जाते. रेटिंग वाढवणे हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. माझ्यावर बोलले ते मला फार आवडलं. त्यांचं भाषण फार मनोरंजक आहे. त्यांचं भाषण ही उत्तर सभा नाही तर उतारा सभा आहे, असं पाटील म्हणाले. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरुनही राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीला टोले लगावले होते. त्याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. केंद्रीय तपास यंत्रणा कशाप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे लागल्या आहेत हे देशाला माहिती आहे. कारण त्यांना महाराष्ट्रातील सरकार पाडायचं आहे, असा आरोपही पाटील यांनी केलाय.

‘मंत्रालयात येत नव्हते, पण वर्षावरुन कारभार करत होते’

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जवळपास दोन वर्षानंतर मंत्रालयात दाखल झाले. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे कोणत्याही विभागात हस्तक्षेप करत नाहीत. पण चांगल्या सूचना नेहमी करतात. मंत्रालयातील प्रशासकीय भागाची पाहणी केली असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. मंत्रालयात येत नव्हते, पण वर्षावरुन कारभार करत होते. आता कोरोना निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांनी बैठका घेण्यास सुरुवात केल्याचंही पाटील यांनी सांगितलं.

इतर बातम्या : 

Nawab Malik ED Action : नवाब मलिकांना ईडीचा मोठा झटका! एकूण 5 ठिकाणची संपत्ती जप्त; काय आहे संपूर्ण प्रकरण?

Jitendra Awhad: तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा दिसतोय ते आरशात पाहा; जितेंद्र आव्हाडांचं खोचक उत्तर