’50 खोके’ चा केक, जितेंद्र आव्हाडांच्या हाती चाकू, कुणाचा वाढदिवस?

| Updated on: Feb 09, 2023 | 1:14 PM

जितेंद्र आव्हाड यांनी हा केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान चर्चेत आहे.

50 खोके चा केक, जितेंद्र आव्हाडांच्या हाती चाकू, कुणाचा वाढदिवस?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे: महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार उलथवून देण्यासाठी खोके घेतल्याचे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पाठ सोडायला तयार नाहीत. शिंदे यांच्या वाढदिवसालाही (Birth Day) याच धारदार  आरोपांनी निशाणा साधण्यात आलाय.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. ठिक ठिकाणी शिंदे यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत केक तयार केले आहेत. सामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून ओळख करून देणारे एकनाथ शिंदे अनेक ठिकाणच्या सोहळ्यांना आवर्जून उपस्थितही राहत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवशी आणखी एका केकची जोरदार चर्चा आहे. तेदेखील शिंदे यांच्या ठाण्यात. हा केक आहे ५० खोके.. असं लिहिलेला. केक कापलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी हा विशेष केक तयार करण्यात आला होता.

कुणाचा वाढदिवस?

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेंद्र विनायक नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्र आव्हाड यांनी काल मुंब्रा मध्ये 50 खोके लिहिलेला केक कापला. वाढदिवसानिमित्त जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा मध्ये काल उपस्थिती दर्शवली होती. यावेळी कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी 50 खोके असा लिहिलेला केक आणला होता. हा केक जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते कापण्याची विनंती यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

खोक्यात बोका…

जितेंद्र आव्हाड यांनी हा केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान चर्चेत आहे. केक कापताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बंडखोरांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. मी केक नव्हे तर खोक्याचं कटिंग करत आहे.. खोक्यामध्ये धोका आहे आणि त्याच खोक्यात बोका आहे असा शब्द उच्चार यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर केक कापताना काढलेला व्हिडिओ तुफान वायरल होत आहे.

वरळीत बॅनर्स

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठिकठिकाणी मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या वरळीत आमदार सदा सरवणकर आणि किरण पावसकर यांच्या कडून बॅनर लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

अमरिकेतही सेलिब्रेशन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ख्याती आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. कारण जसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांचे असंख्य समर्थक आहेत. तसेच परदेशात देखील तरूणाईला त्यांच्या व्यक्तिमत्वाची भुरळ पडायला लागली आहे. त्यामुळेच न्यूयॉर्क येथे कामानिमित्त असलेल्या काही तरूणांनी त्यांचा वाढदिवस टाईम्स स्क्वेअर येथे केक कापून साजरा केला.