Asim Sarode: धनुष्यबाण चिन्ह गोठवणार आणि पक्ष ठाकरेंनाच मिळणार; असीम सरोदेंचा मोठा दावा
Asim Sarode: आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष कोणाचा? यावर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी वकील असीम सरोदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवणार आणि पक्ष ठाकरेंनाच मिळणार असे म्हटले आहे.

आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. गेल्या तीन ते चार सुनावणींमध्ये शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल हेच युक्तिवाद करणार आहेत. दरम्यान, वकील असीम सरोदेंनी मोठी दावा केला आहे. त्यांनी ‘धनुष्यबाण गोठवलं जाईल, शिवसेना ठाकरेंना परत दिली जाईल’ असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने मोठी खळबळ माजली आहे.
सत्याचा विजय होणार
टीव्ही ९ मराठीशी बोलताना असीम सरोदे म्हणाले की, “आपल्याला या महिनाभरामध्ये, पुढचा निकाल येईल असं मला नक्की वाटतं. आणि सत्याचा विजय झालाच पाहिजे. हे इतकं दबाव किंवा प्रेशर आलेलं आहे म्हणजे नैतिकतेचा दबाव आला आहे सुप्रिम कोर्टावर की सत्याचा विजय म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा विजय. सत्याचा विजय म्हणजे मूळ शिवसेना जिंकली पाहिजे याचा विजय. त्यामुळे हे जे चिन्ह आहे, धनुष्यबाण हे आता गोठवून टाकलं जाईल. म्हणजे एकनाथ शिंदेही वापरणार नाहीत, कदाचित उद्धव ठाकरेही वापरणार नाहीत. शिवसेना हा पक्ष त्यांना परत दिला जाईल. आणि मग एकनाथ शिंदे कोणते तरी नवीन चिन्ह घेतील किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील.”
पुढे ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने आपली स्वायत्तता अन् स्वातंत्र्य बाजूला ठेवून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नादी लागून काम केले आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था राहिलेली नसून ती भारतीय जनता पक्षाची बी-टीम झाली आहे आणि म्हणूनच त्यांनी अधिकार नसताना बक्षीसपत्र लिहून दिल्यासारखा बेकायदेशीर निर्णय दिला असे देखील असीम सरोदे म्हणाले.
आतापर्यंत काय घडलं?
गेल्या दोन ते तीन सुनावणीपासून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे सुप्रीम कोर्टात शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. बुधवारी देखील सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे यांना त्यावेळी फक्त आमदारांच्या संख्याबळावर मुख्यमंत्रिपद देण्यात आलं, मुख्यमंत्रिपद देताना सत्य काय ते तपासण्यात आलं नाही, एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड बेकायदेशीर होती, असा युक्तिवाद बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी केला आहे.
दरम्यान बुधवारी बोलताना कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर देखील जोरदार हल्लाबोल केला होता. 1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपद नव्हत, हे यांना 2026 ला कळालं का? असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. तसेच निवडणूक आयोग स्वत:च्या सोईनुसार निर्णय घेतं, असंही यावेळी कपिल सिब्बल यांनी म्हटलं.