Sharad Koli : सीमाभागातील गावं सोडा, साधा खडा उचलला तरी तंगड्या तोडू, कोणी दिला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

Sharad Koli : सीमाप्रश्नावरुन आता थेट धमक्यांचे सत्र सुरु झाले आहे.

Sharad Koli : सीमाभागातील गावं सोडा, साधा खडा उचलला तरी तंगड्या तोडू, कोणी दिला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट इशारा
तर तंगड्या तोडू
Image Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Nov 25, 2022 | 11:57 PM

जळगाव : गेल्या दोन दिवसात सीमा प्रश्नावरुन (Border Dispute) राज्यात रणकंदन माजले आहे. सीमावर्ती भागावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (Karnataka CM) दावा सांगितल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. राज्यकर्त्यांपासून विरोधकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना धारेवर धरले आहे. परंतु, शाब्दिक टीका टिप्पणीवरुन आता हा वाद हातपाय तोडण्याच्या धमक्यांपर्यंत गेला आहे. ठाकरे गटाचे प्रवक्ते शरद कोळी (Sharad Koli) यांनी बोम्माई यांना थेट इशारा दिला आहे.

ठाकरे गटाचे प्रवक्ते शरद कोळी यांनी सीमाभागातील गावं सोडा, साधा खडा उचलला तरी तंगड्या तोडू, असा खणखणीत इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांना दिला आहे. त्यामुळे आता हा वाद पेटला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद हे भाजपचं षडयंत्र असल्याची घणाघाती टीका ही कोळी यांनी केली. हा वाद आताच उकरुन काढण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप कोळी यांनी केला. महाराष्ट्राच्या भूमीवर पाय ठेवाल तर तंगड तोडू असा इशारा त्यांनी दिला.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावर्ती भागातील गावांच्या पाणी प्रश्न सोडविण्याची भूमिका घेतली होती. बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वी सीमावर्ती भागातील कन्नड शाळांना विशेष अनुदान देण्याचीही घोषणा केली होती.

एवढेच नाहीतर ज्या कन्नड भाषिकांनी गोवा मुक्तीसाठी, स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि एकीकरण चळवळीसाठी योगदान दिले, त्यांना पेन्शन लागू करण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्यभरातून कन्नड सरकारच्या या भूमिकेचा निषेध करण्यात आला.

बेळगाव, निपाणी, भालकी येथील मराठी भाषिकांची कर्नाटक सरकार गळचेपी करत आहे. त्याविरोधात अनेक वर्षांपासून शिवसेना आणि इतर पक्ष जोरदार आंदोलन करत आले आहेत. बेळगावला होत असलेल्या आंदोलनापूर्वी मराठी नेत्यांची अनेकदा धरपकडही झालेली आहे.

पण कर्नाटक सरकारने आता थेट जत तालुक्यातील 40 गावांवर, अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यावरही दावा ठोकला आहे. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे कन्नडिंगाविरोधात आक्रमक भाषेचा वापर वाढला आहे.