Prajakta Mali : प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार केलीय का? रुपाली चाकणकर म्हणाल्या….

Prajakta Mali : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा विषय भाजप आमदार सुरेश धस यांनी लावून धरला आहे. या विषयावर बोलताना त्यांनी काल अभिनेत्री प्राजक्ता माळीच नाव घेतलं. त्यामुळे आता या विषयाला वेगळं वळण लागलं आहे.

Prajakta Mali : प्राजक्ता माळीने आमदार सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार केलीय का? रुपाली चाकणकर म्हणाल्या....
Prajakta Mali-Rupali Chakankar
| Updated on: Dec 28, 2024 | 12:26 PM

भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी काल अभिनेत्री प्राजक्ता माळीच नाव घेतलं. “सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल, त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा” असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावला होता. त्यावर प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या बद्दल माहिती दिली आहे.

“अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी अद्याप महिला आयोगाकडे तक्रार केलेली नाही. प्राजक्ता माळी यांनी अद्याप आमच्याशी कुठलाही संपर्क साधलेला नाही. प्राजक्ता माळी यांनी, जर आमच्याकडे तक्रार केली तर त्याची दखल घेतली जाणार” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. “बीडच्या घटनेची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सखोल चौकशी करणार. विरोधकांचे काम आहे, आरोप करणं त्यासंदर्भात मी काय बोलणार?” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

राजगुरुनगरच्या घटनेवर म्हणाल्या…

“राजगुरुनगरमधील घटनेतील पीडित कुटुंबीयांना जी मदत अपेक्षित आहे, ती मदत केली जाणार. राजगुरुनगर घटनेतील आरोपीला फाशी देण्यासंदर्भात आयोगाकडून प्रयत्न केले जाणार” असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

प्राजक्ता माळी घेणार पत्रकार परिषद

या सगळ्या वादावर अभिनेत्री प्राजक्ता माळी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. ‘माझी भूमिका मी पत्रकार परिषदेद्वारे माध्यमांसमोर मांडणार’ असल्याचे प्राजक्ता माळी यांनी सांगितलय. मात्र, पत्रकार परिषदेची वेळ आणि ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाही. प्राजक्ता माळी थेट पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतील. उलट-सुलट सुरु असलेल्या चर्चांना पूर्ण विराम मिळेल.