Shivsena | मराठवाड्यातून ठाकरेंची शिवसेना 90% हद्दपार? आमदारांनंतर खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर, वाचा काय आहे स्थिती?

दरबारी राजकारणाचा आरोप होत असलेल्या उद्धव ठाकरेंना आता राज्यभरातील गावोगाव फिरून पक्ष संघटना वाढवावी लागणार. शिवसेनेचं डॅमेज कंट्रोल त्याशिवाय शक्य नाही, असंच चित्र आहे.

Shivsena | मराठवाड्यातून ठाकरेंची शिवसेना 90% हद्दपार? आमदारांनंतर खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर, वाचा काय आहे स्थिती?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 19, 2022 | 9:03 PM

औरंगाबादः 8 जून 1985 मध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेची मराठवाड्यातली (Marathwada Shivsena) पहिली शिवसेनेची शाखा स्थापन झाली. यंदाच्या जून महिन्यात 2022 मध्ये उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शिवसेनेच्या (Shivsena) याच शाखेचा 37 वा वर्धापनदिन मोठ्या गाजावाजात साजरा केला. येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या ऐतिहासिक मैदानावर स्वाभिमान सभा घेतली. पण मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद आणि मराठवाड्यात पुढच्याच महिन्यात एवढं मोठं खिंडार पडेल, याची कल्पना उद्धव ठाकरेंनाही नसावी. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर आमदारांमधील बंडाळी उफाळून आली. एकनाथ शिंदेंच्या बंडाला मराठवाड्यातील पाच आमदारांनी साथ दिली. आमदारांपाठोपाठ आता खासदारही शिंदेगटात जाण्याच्या वाटेवर आहेत. औरंगाबादेत तर शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटांचे वेगवेगळे मेळावे होत आहेत. बहुतांश पदाधिकारी शिंदे गटात गेल्यामुळे शिवसेनेला आता नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागत आहे.

12 पैकी 9 आमदार शिंदे गटात

औरंगाबादः 6 पैकी 5 आमदार 

  • शिंदे गटातील आमदार– संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार, रमेश बोरनारे, संदिपान भूमरे
  • उद्धव ठाकरे गटातील आमदार– उदयसिंग राजपूत

नांदेडः 1 आमदार  

आमदार बालाजी कल्याणकर शिंदे गटात शामिल

हिंगोली 1 आमदार

 आमदार संतोष बांगर शिंदे गटात शामिल

उस्मानाबाद- 3 पैकी 2 आमदार

  • शिंदे गटातील आमदार– ज्ञानराज चौगुले, तानाजी सावंत
  • उद्धव ठाकरे गटातील आमदार– कैलास पाटील

परभणीचे 1 आमदार

राहुल पाटील उद्धव ठाकरेंच्याच गटात आहेत.

मराठवाड्यातून 3 पैकी 1 खासदार शिंदे गटात

2019 मध्ये मराठवाड्यातून शिवसेनेचे तीन खासदार निवडून आले. यात हिंगोलीचे हेमंत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आधीपासूनच होती. अगदी आमदारांचे बंड झाले तेव्हापासूनच हेमंत पाटील यांचाही बंडखोरीला उघड पाठिंबा दिसून येत होता. त्यावेळी त्यांनी संशयास्पद प्रतिक्रिया दिली तरीही आज मात्र हेमंत पाटील हे नवी दिल्लीतील एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीला हजर होते. त्यामुळे ते शिंदे गटात जातील, हे उघड आहे. परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव हे आज दिल्लीत होते, मात्र त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत न जाता उद्धव ठाकरेंसोबत थांबण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही संजय जाधव हे ऐनवेळी शिंदे गटात जातील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. तर उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे पक्के शिवसैनिक असून आम्ही उद्धव ठाकरेंसोबतच आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

अनेक पदाधिकारी शिंदे गटात…

मराठवाड्यातून आमदारांनी शिंदे गटाची वाट धरल्यानंतर त्यांचे अनेक शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही आता शिंदे गटाची वाट धरली आहे. हिंगोलीचे संतोष बांगर आणि औरंगाबादचे अब्दुल सत्तार, संजय शिरसाट यांनी मुंबईत मोठं शक्ति प्रदर्शन करत आमच्यासोबत हजारो शिवसैनिक शिंदे गटात जात असल्याचे संकेत दिले. त्यामुळे मराठवाड्यातील जवळपास 90 % शिवसेना फुटल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरेंसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळेच पुढील महिन्यापासून उद्धव ठाकरेंनी राज्यभरात जिल्हानिहाय दौरे आयोजित केले आहेत. दरबारी राजकारणाचा आरोप होत असलेल्या उद्धव ठाकरेंना आता राज्यभरातील गावोगाव फिरून पक्ष संघटना वाढवावी लागणार. शिवसेनेचं डॅमेज कंट्रोल त्याशिवाय शक्य नाही, असंच चित्र आहे.