Gautami Patil: गौतमी पाटीलला मोठा धक्का, गणेशोत्सवात थेट कार्यक्रमावरच… खासदाराच्या विरोधाने खळबळ

Gautami Patil: खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील गणेशोत्सवात होणाऱ्या डीजेच्या वापराबाबत तीव्र विरोध व्यक्त केला आहे. त्याचबरोबर गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Gautami Patil: गौतमी पाटीलला मोठा धक्का, गणेशोत्सवात थेट कार्यक्रमावरच... खासदाराच्या विरोधाने खळबळ
Gautami Patil
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 31, 2026 | 10:30 AM

गणेशोत्सव महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि आस्थापूर्ण सण आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण शहर भक्तीमय वातावरणाने नटून जाते. कुठे 5 दिवस तर कुठे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात मंडप सजवले जातात, आरती, भजन, प्रसाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. गणेशोत्सवाला शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. हा उत्सव केवळ धार्मिक नसून सामाजिक एकतेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत उत्सवाच्या स्वरूपात बदल होत असतानाच काही बाबींबाबत नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.याच पार्श्वभूमीवर खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुण्यातील गणेशोत्सवात होणाऱ्या डीजेच्या वापराबाबत तीव्र विरोध व्यक्त केला आहे.

“डिजेला माझा विरोध”

माध्यमांशी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, “पुण्यातील डीजेला माझा विरोध आहे. लोक दिवसभर काम करून येतात आणि संध्याकाळी हा दणदणाट ऐकावा लागतो.” खासदारांनी स्पष्ट केले की, रात्री उशिरापर्यंत चालणारा मोठ्या आवाजातील संगीत नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि कामधंद्यातील लोकांना याचा फटका बसतो.

गौतमी पाटीलचे कार्यक्रम गणेशोत्सवात हे चुकीचे

मेधा कुलकर्णी यांनी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमांबाबतही नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “गौतमी पाटीलचे कार्यक्रमही गणेशोत्सवात ठेवले आहेत, हे चुकीचे आहे.” त्यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा धार्मिक अधिष्ठान असलेला उत्सव आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमांमुळे उत्सवाच्या मूळ स्वरूपाला बाधा येते.

खासदारांनी पुढे म्हटले, “धार्मिक अधिष्ठान आपण जपले पाहिजे. लोकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. गणेशोत्सवाला खूप मोठी परंपरा आहे.” त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, उत्सवात शांतता, भक्ती आणि परंपरेचे पालन व्हावे. डीजे आणि असंबंधित कार्यक्रमांमुळे उत्सवाचे पवित्र वातावरण बाधित होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सव हा केवळ आनंदाचा सण नसून भक्ती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचा उत्सव आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांच्या या विधानातून पुणेकरांनाही उत्सवाच्या मूळ स्वरूपाकडे परत जाण्याचे आवाहन केले गेले आहे. नागरिकांनीही याबाबत संवेदनशीलता दाखवून उत्सव शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us