आमदार पांडुरंग बरोरांच्या शिवसेना प्रवेशाला भावाचा विरोध, राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी

| Updated on: Jul 10, 2019 | 9:45 AM

पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेनेत जाण्याला त्यांचे सख्खे चुलत बंधू भास्कर बरोरा यांनी कडाडून विरोध केला आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शहापूरमध्ये पांडुरंग बरोरा विरुद्ध भास्कर बरोरा अशी लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार पांडुरंग बरोरांच्या शिवसेना प्रवेशाला भावाचा विरोध, राष्ट्रवादीकडून लढण्याची तयारी
Follow us on

शहापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे वाडा-शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईतील शिवसेना भवनात पांडुरंग बरोरा यांचा आज (10 जुलै) पक्षप्रवेश होणार आहे. पण पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेनेत जाण्याला त्यांचे सख्खे चुलत बंधू भास्कर बरोरा यांनी कडाडून विरोध केला आहे. “जर त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळाली, तर मी स्वत: त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी अर्ज दाखल करेन असे भास्कर बरोरा यांनी सांगितले आहे.” यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शहापूरमध्ये भावा विरुद्ध भाऊ अशी चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शहापुर राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी काल (9 जुलै) आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. यानतंर आज ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेणार आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्तेही प्रवेश घेणार असल्याचे बोललं जात आहे.

यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाला 90 टक्के शिवसैनिकांनी विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे शहापुरचे तालुकाध्यक्ष मारुती धीर्डे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इतकंच नव्हे तर आमदार पांडुरंग बरोरा यांचे सख्खे चुलत भाऊ भास्कर बरोरा यांनीही त्याच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. तसेच जर त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळाली तर मी राष्ट्रवादीतून त्यांच्या विरोधात उमेदवारीसाठी अर्ज करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

त्याशिवाय 3 वेळा शिवसेनेतून निवडून माजी आमदार दौलत दरोडा यांना यंदा उमेदवारी मिळू नये म्हणून शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मारुती धीर्डे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा डाव रचला जात असल्याचा गंभीर आरोप शहापूरमधील काही शिवसैनिकांनी केला आहे. तसेच 2014 मध्ये माजी आमदार दौलत दरोडा यांना पडण्यामागे धीर्डे आणि शिंदे हे दोघे प्रमुख कारण होते. जर दरोडा 2014 ला पुन्हा एकदा निवडून आले असते, तर त्यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाले असते, म्हणून त्यांना जाणूनबुजून पाडण्यात आले आहे. त्यांना पाडण्यामागचे प्रमुख सूत्रधार शिवसैनिक असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे.

कोण आहेत पांडुरंग बरोरा?

आमदार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादीचे वाडा-शहापूरचे  आमदार आहेत. बरोरा यांचे 40 वर्षांपासून राष्ट्रवादी शी आणि शरद पवार, अजित पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. पांडुरंग बरोरा हे 2014 मध्ये मोदी लाटेतही राष्ट्रवादीकडून निवडून आलेले एकमेव आदिवासी आमदार आहेत.