आमदार थोपटेंच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यालयावर दगडफेक, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राडा

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नाराजीचा कडेलोट होताना दिसत आहे.

आमदार थोपटेंच्या कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यालयावर दगडफेक, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राडा
| Edited By: | Updated on: Dec 31, 2019 | 7:41 PM

पुणे : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने महाविकास आघाडीतील तीनही पक्षातील नाराजीचा कडेलोट होताना दिसत आहे. कारण काँग्रेस आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thopte) यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने, त्यांच्या समर्थकांनी थेट काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली आहे. आज संध्याकाळी ही घटना पुणे येथील काँग्रेस भवनमध्ये घडली.

ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल 30 डिसेंबरला झाला. मात्र तीन पक्षांच्या या सरकारमध्ये मंत्रिपदं न मिळाल्याने तीनही पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. त्याचाचा परिणाम म्हणून आमदार संग्राम थोपटे (MLA Sangram Thopte) यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पुण्यातील काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. याशिवाय काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने अनेकजण नाराज आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नसीम खान, तीन वेळा आमदार असलेल्या प्रणिती शिंदे, संग्राम थोपटे, अमिन पटेल यांचा समावेश आहे. यांनी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे नाराजी  दर्शवली.

दरम्यान, संग्राम थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. थोपटे आतापर्यंत भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.