नरेंद्र मोदी नवीन भारताचे नवीन हिटलर : मनसे

| Updated on: Aug 19, 2019 | 10:08 AM

मोदी सरकार सूडबुद्धीने वागत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर आहेत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला

नरेंद्र मोदी नवीन भारताचे नवीन हिटलर : मनसे
Follow us on

मुंबई : नवीन भारताचे नवीन हिटलर जर कोणी असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहेत. मोदी सरकार सूडबुद्धीने वागत आहे, असा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे. कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत

जो तुमची प्रकरणं बाहेर काढेल, जो तुमच्याविरोधात बोलेल, त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. सीबीआय, ईडी हे सगळे भाजपचे कार्यकर्ते झाले आहेत. मात्र या कार्यकर्त्यांशी कसं डील करायचं, हे मनसेला माहित आहे, अशा शब्दात देशपांडेंनी चॅलेंज दिलं.

राज ठाकरे ईव्हीएमविरोधात जे आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याची भाजपला भीती आहे. मागील पाच वर्षात कोणत्या भाजप नेत्याची सीबीआय, ईडी चौकशी झाली का? हे सरकार सूडबुद्धीने सारं काही करत आहे, असा घणाघात संदीप देशपांडेंनी केला.

भाजप सरकार मंत्र्यांवर कारवाई करत नाही. फक्त विरोधी पक्ष नेत्यावर कारवाई केली जात आहे. मनसे कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, आम्ही आमचं आंदोलन सुरुच ठेवू, आता तर अधिक तीव्र करु, असा इशाराही संदीप देशपांडेंनी दिला.

काय आहे प्रकरण?

कोहिनूर सीटीएनएलमध्ये आयएल अॅण्ड एफएस ग्रुपच्या कर्ज आणि 860 कोटींच्या गुंतवणुकीचा तपास ईडी करत आहे. ही कंपनी मुंबईत कोहिनूर स्क्वेअर टॉवर्स उभारत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे पुत्र उन्मेश जोशी यांनी ही कंपनी सुरु केली होती. कोहिनूर मिल क्रमांक 3 विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असल्याने ते ईडीच्या रडारवर होते.