राजभवन भाजपचं हेडऑफिस तर भाजप नेते अधिकारी; ‘या’ नेत्याचं टीकास्त्र

| Updated on: May 24, 2023 | 3:05 PM

Bhagwant Mann on BJP : भाजपवर विरोधी पक्षातील नेत्याचा घणाघात; राजभवनावर डागलं टीकास्त्र

राजभवन भाजपचं हेडऑफिस तर भाजप नेते अधिकारी; या नेत्याचं टीकास्त्र
Follow us on

मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी या तिघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. तेव्हा भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्यभवन भाजपचं हेडऑफिस बनलं आहेआणि भाजप नेते अधिकारी बनले आहेत, असा घणाघात भगवंत मान यांनी केला.

मातोश्रीवर आल्यावर आम्हाला घराच्या सारखं वातावरण अनुभवायला मिळतं. सध्या लोकशाही संकटात आहे. Elected च्या जागी Selected लोक राजकारणात आहेत. आपल्या मर्जीतला राज्यपाल निवडा आणि बसवा, असं सध्या देशात सुरू आहे. राज्यभवन भाजपचं हेडऑफिस बनलं आहेत आणि भाजप नेते अधिकारी बनले आहेत. आम्हीच राज्य करू असाच अविर्भाव त्यांचा आहे. आम्ही सध्या विरोधीपक्षात आहोत. पण सध्या जे देश चालवत आहेत ते खरे विरोधी आहेत, असं भगवंत मान म्हणाले आहेत.

भाजपला आता असं वाटतंय की, ते हळू हळू देशात हरत चाललेत. देश वाचवायला सगळ्यांना एकत्र आलं पाहिजे. 2024 मध्ये जर भाजप पुन्हा सत्तेत आलं तर हे देशाचं संविधान बदलतील. 2024 मध्ये आल्यावर ते घोषणा करतील की पुढची 40 वर्षे मीच देशाचा पंतप्रधान राहणार आहे. देशाला वाचवण्यासाठी आम्हाला एकत्र आलंच पाहिजे, असं भगवंत मान म्हणालेत.

भगवंत मान यांनी उद्धव ठाकरे यांना पंजाबला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. आपण सहपरिवार पंजाब यावं. तुमच्या येण्याची मी वाट बघेन, असं भगवंत मान म्हणाले आहेत.

या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनीही विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अरविंद केजरीवाल याआधीही मातोश्रीवर आले आहेत. नातं जपण्यासाठी शिवसेना आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोकं केवळ राजकारण करतात. पण आम्ही नातं जपतो. लोकशाही कायम ठेवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आजपासून आपण सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हटलं पाहिजे. गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्वाचे निकाल दिले आहेत. आपच्या संदर्भात जो निर्णय दिला तो लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण केंद्राने अध्यादेश आणला. राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

एक नवीन नातं जोडलं गेलं आहे. आम्हाला काय करायचं आहे, पुढे कसं करायचं आहे याची चर्चा झाली. विरोधी पक्षातच्या एकतेची जी भूमिका आहे त्यात अरविंद जी यांचा एक मोठा वाटा आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी आजच्या भेटीवर भाष्य केलंय.