“कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र आले तरी आमच्याकडे एकनाथ! सरकार आमचंच येणार”

| Updated on: May 25, 2023 | 10:25 AM

Uday Samant on CM Eknath Shinde : काहीही झालं तरी राज्यात सरकार युतीचंच येणार; 'या' मंत्र्याला विश्वास

कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र आले तरी आमच्याकडे एकनाथ! सरकार आमचंच येणार
Follow us on

रत्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिलेले असताना राज्यात सरकार आमचंच येणार, असा दावा महाविकास आघाडी आणि युतीकडून करण्यात येत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही सरकार शिवसेना-भाजप युतीचंच येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर बोलताना सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागनाथ सापनाथ एकत्र आले आहेत. पण पुढे जाऊन मी असं म्हणेन की कितीही नागनाथ-सापनाथ एकत्र आले तरी सरकार आमचंच येणार. त्यांच्याकडे नागनाथ-सापनाथ आहेत. पण आमच्याकडे एकनाथ आहेत, त्यामुळे आमचंच सरकार येणार आहे, असं उदय सामंत म्हणालेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात युतीचं सरकार चांगलं कार करतंय. त्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठलाय. पण आमचं सरकार चांगलं काम करतंय. सरकार आमचंच येणार, असं उदय सामंत म्हणालेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीच्या दौऱ्यावरती आहेत. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत येत आहेत. खारघरसारखी दुर्घटना घडू नये म्हणून या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. मंडपात प्रत्येक खुर्चीवर पाण्याची बाटली आणि इलेक्ट्रॉल पावडरची पाकिटे ठेवण्यात आली आहेत. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

सामनातील अग्रलेखावर भाष्य

आजच्या सामनातून सरकारवर टीका करण्यात आली आहे. विषाणूचं राज्य म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे. त्यावरही उदय सामंत म्हणाले आहेत. संजय राऊत यांना सतत चर्चेत राहण्याची सवय आहे. त्यांच्याकडे आता काहीही कामं राहिलेली नाहीत, असं उदय सामंत यांना म्हटलं आहे.

सामना अग्रलेखात काय?

मागील दीड-दोन दशकांपासून स्वाईन फ्लू, चिकुनगुनिया, सार्स, मर्स, बर्ड फ्लू, झिका, इबोला, मारबर्ग, निपाह, कोरोना, ओमायक्रोन आणि त्याचे नवनवीन उपप्रकार अशा विविध विषाणूंच्या तडाख्यात जग सापडले आहे. सर्वत्रच विषाणूंचे राज्य दिसत आहे. मानवी आरोग्यासाठी धोकादायक विषाणू जसे आहेत तसे मानवी जीवन सुरळीत आणि सुरक्षित करणारी शासन व्यवस्था, राज्यघटना, धार्मिक व सामाजिक सलोखा, लोकशाही धोक्यात आणणारेदेखील आहेत. मानवी आरोग्यासाठी घातक विषाणूंसाठी प्रतिबंधक लसीची मात्रा प्रभावी ठरते तर लोकशाहीसाठी धोकादायक ठरणाऱ्या विषाणूंवर जनतेची ‘मात्रा’ परिणामकारक ठरते, असं आजच्या सामनात म्हणण्यात आलं आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ‘शासन आपल्या दारी’ या योजनेचा शुभारंभ करण्यासाठी रत्नागिरीत येत आहेत. त्यांच्या रत्नागिरी सज्ज झालीये. विकास हाच आमचा ध्यास आहे, असं उदय सामंत म्हणालेत.