
“शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्ताने हे सरकार प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करतंय हे सिद्ध झालंय. रस्ते, पूल आणि सर्व मोठ्या प्रकल्पात भ्रष्टाचार होत आहे. मालवणमध्ये पुतळा झाला. शिल्पकाराचा अनुभव नव्हता तरीही त्याला पैसे दिले. त्याला फक्त 26 लाख मिळाले. बाकीचे पैसे कुठे गेले? त्याची चौकशी झाली पाहिजे. आपटे सामान्य माणूस असेल. तोही पोलिसांपासून लपू शकतो. पोलिसांना चकवा देऊ शकतो. तो सराईत गुन्हेगार नाही” असं जयंत पाटील म्हणाले. TV9 मराठीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ कार्यक्रमात ते बोलत होते.
“कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली असेल. ढासळली म्हणणं चुकीचं ठरेल. ती शून्य झाली. बदलापूरची घटना पाहा. नागपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जुगार खेळत होते. वचक राहिला नाही. सरकारने नैतिकता गमावली आहे. सर्व विभागात पोस्टिंग देताना कशी होते ते जगजाहीर आहे. त्यामुळे नैतिकता राहिली नाही. पारदर्शकता नाही. धमकी दिली जात आहे. अधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात आहेत” असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
‘महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला’
“आमची माफी मागा ही मागणी नव्हतीच. हा भ्रष्टाचार झालेला आहे. महाराजांचा पुतळा कोसळला. महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. त्याचं प्रायश्चित सरकारने घेतलं पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. आता हे माफी मागत फिरत आहेत. पण महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही” असा दावा जयंत पाटील यांनी केला.
‘माफी मागावी ही आमची कधीच मागणी नव्हती’
“राज्यातील जनता सर्व गोष्टी सहन करेल, पण महाराजांचा पुतळा पडणं कधीच सहन करणार नाही. त्यातील भ्रष्टाचार कधीच खपवून घेणार नाही. राज्यातील जनता त्यांना कधीच माफी देणार नाही. माफी मागावी ही आमची कधीच मागणी नव्हती. कारण महाराष्ट्र यांना ऐकणार नाही. हे त्यांना समजलं आहे. त्यामुळे माफी मागत फिरत आहेत. पण जनता त्यांना माफी देणार नाही” असं जयंत पाटील म्हणाले.