काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या हालचालींना वेग, नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार

| Updated on: Feb 03, 2021 | 7:31 AM

नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार असल्याची माहिती मिळतीय. | Nana Patole Will  Meet Congress High Command

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या हालचालींना वेग, नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार
Nana patole
Follow us on

मुंबई :  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवड लांबतच चालली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चर्चांवर चर्चा आणि बैठकांवर बैठका पार पडत आहे. पण तरीही पुढचे महराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? हे समोर येत नाहीय. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव जरी निश्चित मानलं जात असलं तरी त्यांचं नाव आणखी जाहीर होत नाहीय. अशा सगळ्या परिस्थितीत आता नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला जाणार असल्याची माहिती मिळतीय.  (Nana Patole Will  Meet Congress High Command)

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे नव्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात सगळे अधिकार दिलेले आहेत. नुकतीच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्लीत काँग्रेस मंत्र्यांची आणि महत्त्वाच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीतही केवळ चर्चेचं गुऱ्हाळंच पार पडलं. त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. नव्या अध्यक्षनिवडीसंदर्भात होत असलेला विलंबावरुन सध्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली.

पटोले पक्षश्रेष्ठींची भेट घेणार

दरम्यान, नाना पटोले दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन त्यांच्या कानावर होत असलेला विलंब आणि त्यामुळे पक्षाविषयी समाजात जाणारा चुकीचा मेसेज याविषयांवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेस प्रभारींचे महाराष्ट्रात ठाण

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यात ठाण मांडले होते. आमदारांच्या वारंवार भेटीगाठी घेऊन त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न ते करत होते. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठा नेत्याची वर्णी लावल्यानंतर प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी नेत्याची वर्णी लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

नाना पटोलेंचे नाव का आघाडीवर?

नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर बार्गेनिंग करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि ठाकूर यांची नावे मागे पडून नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात येईल, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

(Nana Patole Will  Meet Congress High Command)

हे ही वाचा :

‘माझी भूमिका तीच फडणवीसांचीही’, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

…आणि धनंजय मुंडेंनी सरकारी अधिकाऱ्याला भर बैठकीतून हाकलले!