Narayan Rane : आदित्य आणि रश्मी ठाकरे नगरविकास खाते चालवायच्या, शिंदे नावालाच मंत्री होते; राणेंचा गंभीर आरोप

| Updated on: Jul 26, 2022 | 6:06 PM

Narayan Rane : मी आजारी होतो. माझं ऑपरेशन झालं. मी शुद्धीवर नव्हतो आणि त्याच वेळेला सरकार पडलं असं उद्धव ठाकरे सांगत आहेत. तुम्ही वेळ देत नव्हता. कामं करत नव्हता. म्हणून आमदार सोडून गेले. अडीच वर्षात कधी आमदारांना भेटला का? हे सर्व जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.

Narayan Rane : आदित्य आणि रश्मी ठाकरे नगरविकास खाते चालवायच्या, शिंदे नावालाच मंत्री होते; राणेंचा गंभीर आरोप
आदित्य आणि रश्मी ठाकरे नगरविकास खाते चालवायच्या, शिंदे नावालाच मंत्री होते; राणेंचा गंभीर आरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे कुटुंबाने एकनाथ शिंदे यांना प्रचंड छळलं. शिंदे यांना नगरविकास खातं दिलं. पण आदित्य ठाकरे (aaditya thackeray)आणि रश्मी ठाकरे हे खातं चालवत होत्या. शिंदेना काहीच अधिकार नव्हते. शिंदे नावालाच मंत्री होते, असं सांगतानाच आता मात्र उद्धव ठाकरे खोटे सांगत आहेत. खोट्या मुलाखती देत आहेत. तुम्ही काहीही करा. आता शिवसेना उभी राहणार नाही. आता तुम्ही शाखा शाखांमध्ये फिरत आहात. पण शाखांमध्ये निष्ठावंत सैनिक कुठे आहेत? सर्व सैनिक शिंदेंच्या सोबत आहेत, असं नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी गेल्या अडीच वर्षात किती मराठी तरुणांना नोकऱ्या दिल्या. किती मराठी माणसांना उद्योग दिले. कुठे त्यांची वर्णी लावली? असा सवाल करतानाच मोदींवर टीका करण्याची तुमची लायकी आहे का? पात्रता आहे का? असा सवालही त्यांनी केला.

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. खोबरं गेलं. पाणी गेलं. हातात करवंटी आली. आता रडून काय उपयोग? असा सवाल राणे यांनी केलं. मी आजारी होतो. माझं ऑपरेशन झालं. मी शुद्धीवर नव्हतो आणि त्याच वेळेला सरकार पडलं असं उद्धव ठाकरे सांगत आहेत. तुम्ही वेळ देत नव्हता. कामं करत नव्हता. म्हणून आमदार सोडून गेले. अडीच वर्षात कधी आमदारांना भेटला का? हे सर्व जण एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. गुवाहाटीला गेले असतील. आणखी कुठे गेले असतील. पण ते तुमच्यासोबत राहिले नाहीत. कारण त्यांना तुमच्यासोबत राहायचे नव्हते. शिंदेंनी त्यांची कामे केली. त्यांच्या भावना समजून घेतल्या. म्हणूनच ते त्यांच्यासोबत गेले, असं राणे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बोगस मुलाखत आहे

शिंदेंसोबत आमदार निघून गेल्याने उद्धव ठाकरे यांचा पोटशूळ उठला. त्यामुळेच त्यांनी संजय राऊत यांना मुलाखत घ्यायला सांगितली. मी राऊत यांना पत्रकार मानतच नाही. यांनी प्रश्न उत्तरं लिहून द्यायचे आणि त्यांनी उत्तरे द्यायचे. ही बोगस मुलाखत आहे. या मुलाखतीला काहीच अर्थ नाही, अशी टीका राणेंनी केला.

तर ही वेळ आली नसती

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली उतरवायचे आणि आता त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी ही मुलाखत आहे. गुरुने म्हणजे शरद पवारांनी दिलेलं काम राऊतांनी पूर्ण केलं आहे. सरकार पाडलं, असं सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणतात, माझ्याच माणसाने विश्वासघात केला. तुम्ही कार्यकर्त्यांना विश्वास दिला असता, त्यांची कामे केली असती तर ही वेळ आली असती का? पक्षाचा खासदार आणि आमदार अडचणीत असताना मदत केली असती तर ही वेळच आली नसती. कधी मातोश्री बाहेरच्या शिवसैनिकाला काही दिलं का? असा सवालही त्यांनी केला.

मला बोलायला लावू नका

शिवसेनाप्रमुखांचा फोटो आम्ही लावणारच. तुमचे वडील असतील. पण ते आमचे देव आहेत. आमचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे त्यांचा फोटो लावण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. वडील वडील म्हणताय. वडिलांचा किती छळ केला हे मला माहीत आहे. मला बोलायला लावू नका, असा इशाराच त्यांनी दिला.